बॉलिवूडच्या ज्येष्ठ अभिनेत्री शशिकला यांचे रविवारी निधन झाले. त्यांच्या निधनाच्या बातमीने चित्रपटसृष्टीत सगळ्यांना धक्का बसला आणि अनेकांनी हळहळ व्यक्त केली. बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांनी देखील त्यांचे दु:ख व्यक्त केले.

धर्मेंद्र यांनी सुरूवातीच्या काळात शशिकला यांच्या सोबत काम केले होते. ‘स्पॉटबॉय’ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी या बद्दल सांगितले. “आम्ही एकत्र अनेक उत्तम चित्रपट केले. मी त्यांच्यासोबत केलेल्या सगळ्या चित्रपटांचे नाव मला आठवत नाहीत. परंतु माझ्या आवडत्या ‘अनुपमा’, ‘देवर’ आणि ‘फूल और पत्थर’ या तीन चित्रपटांमध्ये शशिकला यांनी उत्तम अभिनय केला होता,” असे धर्मेंद्र म्हणाले.

पुढे ते म्हणाले, “मी जेव्हा चित्रपटसृष्टीत काम करायला सुरूवात केली त्याच्या आधी शशिकला यांनी अनेक चित्रपट केले होते. मला वाटतं ‘अनपड’ हा आमचा पहिला एकत्र चित्रपट होता. या चित्रपटात माला सिन्हाने मुख्य भूमिका साकारली होती. मदन मोहन साब-लताजींच्या गाण्यासाठी आजही हा चित्रपट ओळखला जातो. मी नवीन असल्याने मी चिंतेत असायचो, तेव्हा शशिकला यांनी मला समजवले, ‘ऐ धरम, आओ हमारे साथ खाना खाओ’, त्या मला चित्रीकरणाच्या वेळी त्यांच्यासोबत जेवणाचा आग्रह धरायच्या, माझ्या सारख्या नवीन कलाकारासोबत त्या प्रेमाने वागायच्या, हे मी कधीच विसरू शकणार नाही. नवीन येणाऱ्या कलाकारांसोबत प्रेमाने वागायला त्यांनी मला शिकवलं.”

धर्मेंद्र शशिकला यांच्या रील लाईफ आणि रीयल लाईफबद्दल बोलताना म्हणाले, “शशिकला या त्यांच्या खलनायिकेच्या भूमिकेमुळे खलनायिका म्हणूनच ओळखल्या जात होत्या. ‘फुल और पत्थर’ या चित्रपटातील त्यांची भूमिका आजही अनेकांच्या लक्षात आहे. या चित्रपटातील ‘जिंदगी में प्यार करणा सिखले’ हे गाणं तर लोकप्रिय ठरलं होतं. ऋषिकेश मुखर्जी यांच्या ‘अनुपमा’ या चित्रपटात त्यांनी चौकटीच्या बाहेर येऊन सकारात्मक भूमिका साकारली. त्यांनी चित्रपटांमध्ये कमी सकारात्मक भूमिका साकारल्या. मात्र, खऱ्या आयुष्यात त्यांच्यासारखी आपुलकी ही कोणालाच नव्हती.”

धर्मेंद्र पुढे शशिकला यांच्या चित्रपटसृष्टीनंतरच्या प्रवासाबद्दल सांगत होते. ते म्हणाले, “शशिकला या कालांतराने चित्रपटसृष्टीपासून लांब गेल्या. त्या त्यांच्या संपूर्ण कुटुंबासोबत पुण्याला राहू लागल्या. नशिबाने शशिकला या त्यांच्या शेवटच्या क्षणी जेष्ठ अभिनेत्री ललिता पवार यांच्यासारख्या एकट्या राहिल्या नाही, ललिता या त्यांच्या शेवटच्या क्षणी एकट्या होत्या, त्यांच्या निधनाची बातमी अनेक दिवसांनंतर सगळ्यांना समजली, तसे शशिकला यांच्यासोबत झाले नाही ही सुदैवाची गोष्ट आहे. त्या पुण्यात गेल्यानंतर त्यांचा आणि माझा कधी संपर्क झाला नाही याची मला खंत आहे.”