बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राचा नुकताच रिलीज झालेल्या ‘शेरशाह’ चित्रपटात त्याने केलेल्या अफलातून अभिनयाचं सर्वच स्तरातून कौतुक केलं जातंय. अनेक चित्रपट समिक्षकांनी देखील त्याच्या परफॉर्मन्सचं भरभरून कौतुक केलंय. पण तुम्हाला माहितेय का, या चित्रपटातील कॅप्टन विक्रम बत्रा यांच्या भूमिकेसाठी बॉलिवूडचा दबंग अभिनेता सलमान खानने मेहुणा आयुष शर्माला घेण्यासाठी बरेच प्रयत्न केले होते. इतकंच नव्हे तर त्याने चित्रपटाच्या मेकर्सना अप्रोच देखील केलं होतं. जर हे शक्य झालं असतं तर आयुष्य शर्माची ही डेब्यू फिल्म ठरली असती.
‘शेरशाह’ चित्रपटाचे प्रोड्यूसर शब्बीर बॉक्सवाला यांनी नुकतंच एका माध्यमाला दिलेल्या मुलाखतीत हा मोठा खुलासा केलाय. ज्यावेळी या ‘शेरशाह’ चित्रपटासाठी स्क्रीप्ट लिहिण्याचं काम सुरू होतं तेव्हापासून अभिनेता सलमान खानला हा चित्रपट प्रोड्यूस करण्याची इच्छा होती. तसंच या चित्रपटातून त्याचा मेहुणा आयुष शर्माने डेब्यू करावं अशी देखील त्याची इच्छा होती. पण हे शक्य होऊ शकलं नाही. कारण कॅप्टन विक्रम बत्रा यांच्या कुटुंबियांकडून चित्रपटासाठीचे अधिकार मिळवले होते आणि त्यांनी आधीच अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा याच्या नावावर शिक्कामोर्तब केला होता, असं शब्बीर यांनी या मुलाखतीत म्हटलंय.
यापुढे बोलताना प्रोड्यूसर शब्बीर बॉक्सवाला यांनी सांगितलं, “सलमानने ज्यावेळी मला संपर्क केला होता, त्यावेळी जंगली पिक्चर्ससोबत माझी बातचीत सुरू होती. म्हणून तो माझ्यासोबत पार्टनरशीप देखील करण्यासाठी तयार होता. पण तोपर्यंत कॅप्टन विक्रम बत्रा यांच्या भूमिकेसाठी त्यांच्या कुटुंबियांनी अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राची निवड केली होती. त्यामुळे कोणत्या दुसऱ्या अभिनेत्यासाठी सिद्धार्थ मल्होत्राला चित्रपटातून बाहेर करणं हे खूपच अनैतिक झालं असतं. ज्यावेळी कॅप्टन विक्रम बत्रा यांच्या कुटुंबियांनी मला चित्रपट करण्यासाठीचे अधिकार दिले, तो क्षण माझ्यासाठी खूप महत्त्वाचा होता. त्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला आणि मला काहीही करून त्यांचा विश्वास गमवायचा नव्हता. म्हणून मग मी सलमानला समजवलं.”
आयुष शर्माची पहिली डेब्यू फिल्म ठरली फ्लॉप
आयुष शर्माने सलमान खानचंच प्रोडक्शन हाउस ‘सलमान खान फिल्म्स’च्या ‘लवयात्री’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केलं होतं. या चित्रपटाचं समिक्षकांनी कौतुक केलं खरं, पण हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हवा तितका चालला नाही. त्यानंतर आयुष शर्मा लवकरच ‘अंतिम: द फाइनल ट्रुथ’ या चित्रपटात झळकणार आहे. त्याच्यासोबत सलमान खान सुद्धा दिसणार आहे.