दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतची सर्वात शेवटचा चित्रपट ठरलेला ‘दिल बेचारा’ रिलीज होऊन आज एक वर्ष पूर्ण झालं आहे. त्या निमित्ताने फॉक्स स्टार स्टूडिओजने सुशांतचे पडद्यामागचे काही सीन्स आणि व्हिडीओ क्लिप्स एकत्र करत एक स्पेशल व्हिडीओ शेअर केलाय. सुशांतवर तयार केलेला हा व्हिडीओ पाहून डोळ्यात पाणी तरळल्याशिवाय राहणार नाही. फॉक्स स्टारने शेअर केलेल्या या व्हिडीओमुळे सुशांतच्या आठवणी पुन्हा एकदा जाग्या झाल्या.
फॉक्स स्टारने त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर हा स्पेशल व्हिडीओ शेअर केलाय. अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर त्याचा शेवटचा चित्रपट ठरलेला ‘दिल बेचारा’ त्याच्या फॅन्ससाठी खूपच खास ठरला. हा चित्रपट डिज्नी प्लस हॉट स्टारवर रिलीज झाला होता. आज या चित्रपटाला रिलीज होऊन एक वर्ष पूर्ण झालंय. या शेवटच्या चित्रपटातही सुशांत म्हणजे मॅनीने घेतलेली एक्झिट मनाला चटका लावणारी होती. फॉक्स स्टारने शेअर केलेला हा स्पेशल व्हिडीओ पाहून आजही सुशांतच्या फॅन्सना आपल्या अश्रूंना आवर घालता आला नाही. चाहत्यांचं सुशांतवर आणि सुशांतचंही चाहत्यांवर तितकंच असलेलं हे प्रेम पाहून सुशांतच्या आठवणीत पुन्हा गहिवरून आल्याशिवाय राहणार नाही. सुशांतचे चाहते हा व्हिडीओ पाहिल्यानंतर पुन्हा इमोशनल झालेत. तशाच प्रतिक्रिया हा व्हिडीओ पाहिल्यानंतर चाहत्यांनी दिल्या आहेत.
या व्हिडीओत ‘दिल बेचारा’ चित्रपटाचे दिग्दर्शक मुकेश छाबराही आहेत. विशेष म्हणजे छाबरा यांनीच कास्टिंग डायरेक्टर म्हणून सुशांतला ‘काय पो छे’ या चित्रपटात हिरो म्हणून संधी दिली होती. हा सुशांतचा पहिला चित्रपट. तर ‘दिल बेचारा’ हा मुकेश छाबरा यांनी दिग्दर्शित केलेला सुशांतचा शेवटचा चित्रपट. या व्हिडीओमध्ये त्यांनी सुद्धा सुशांतच्या आठवणी शेअर केल्या.
‘दिल बेचारा’ हा चित्रपट 2014 च्या ‘फॉल्ट इन आर स्टार्स’ या हॉलिवूड चित्रपटाचा रिमेक आहे. प्रसिद्ध कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाबरा यांनी ही फिल्म दिग्दर्शित केली आहे. शशांक खेतान आणि सुप्रोतिम सेनगुप्ता यांनी या चित्रपटाची कथा लिहिली आहे. तर ए. आर. रेहमान यांनी संगीत दिलं आहे. या चित्रपटात सुशांत आणि संजना यांच्यासह सैफ अली खान आणि स्वस्तिका मुखर्जीदेखील आहे.