Tabu & Nagarjuna Affair Rumours : तब्बू बॉलीवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री आहे. गेली अनेक वर्ष ती अभिनय क्षेत्रात सक्रिय आहे. आजवर तिने अनेक चित्रपटांत विविध भूमिका साकारल्या आहेत. आज अभिनेत्रीचा वाढदिवस आहे. तब्बूच्या खासगी आयुष्याबद्दल बोलायचं झालं तर अभिनेत्री ५४ वर्षांची असून तिने लग्न केलेलं नाहीये. परंतु, एकेकाळी तिचं नाव लोकप्रिय दाक्षिणात्य अभिनेत्यासह जोडलं गेलं होतं.

तब्बूचं दाक्षिणात्य अभिनेते नागार्जून यांच्याबरोबर नाव जोडलं गेलं होतं. त्यावेळी दोघांनी त्यांच्या कथित अफेअरबद्दल प्रतिक्रियाही दिलेली. एवढंच काय तर नागार्जून यांच्या पत्नी अमाला अकीनेनी यांनीही याबद्दल प्रतिक्रिया दिलेली. ‘टाइम्स ऑफ इंडिया’च्या वृत्तानुसार नागार्जूनच्या पत्नी अमाला यांनी तब्बूबरोबरच्या नागार्जून यांच्या कथित अफेअरबद्दल स्पष्ट प्रतिक्रिया दिलेली.

नागार्जून यांच्या पत्नीने दिलेली प्रतिक्रिया

अमाला म्हणालेल्या, त्यांचं घर एका मंदिराप्रमाणे पवित्र आहे आणि फिल्म इंडस्ट्रीतील कोणत्याही गोष्टीला त्या घरात येऊ देत नाही. त्यांनी असंही सांगितलेलं की याबद्दल त्यांचं नागार्जून यांच्याबरोबर कधीच बोलणं झालं नाही. त्या याबद्दल म्हणालेल्या, “माझं घर मंदिराप्रमाणे पवित्र आहे, आम्ही याबद्दलही कधीही एकमेकांबरोबर चर्चा केली नाही आणि माझा विश्वास आहे तो कोणीही तोडू शकत नाही. आमच्या घरात काय घडत आहे याची कोणालाही काळजी करण्याची गरज नाही, मी आनंदी आहे.”

‘न्यूज १८’च्या वृत्तानुसार तब्बूचं नाव अनेक सेलिब्रिटींबरोबर जोडलं गेलं आहे. तब्बू संजय कपूर यांच्याबरोबर रिलेशनशिपमध्ये होती. दोघांनी त्यांचा चित्रपट ‘प्रेम’दरम्यान डेट करायला सुरुवात केलेली. परंतु, काही दिवसांनंतरच ते वेगळे झाले. उल्लेख केलेल्या माध्यमाच्या वृत्तानुसार तब्बूचं दिग्दर्शक साजित नाडियादवाला यांच्याबरोबरही अफेअर होतं. ‘जीत’ चित्रपटादरम्यान त्यांची ओळख झालेली.

नागार्जून यांच्याबरोबरच्या तब्बूच्या रिलेशनशिपच्या अफवांबद्दल अनेकांना धक्का बसला होता, कारण नागार्जून यांचं लग्न झालेलं. त्यावेळी त्यांचं अभिनेत्री अमाला यांच्याबरोबर लग्न झालेलं आणि हे त्यांचं दुसरं लग्न होतं.