सुबोध भावेनंतर 'हा' आघाडीचा अभिनेता साकारणार बालगंधर्व यांची भूमिका, फोटो व्हायरल | Abhijeet kelkar will be playing role of balgandharva in yog yogeshwar jayshankar serial | Loksatta

सुबोध भावेनंतर ‘हा’ आघाडीचा अभिनेता साकारणार बालगंधर्व यांची भूमिका, फोटो व्हायरल

त्याने ‘बालगंधर्व’ या चित्रपटातही महत्वपूर्ण भूमिका साकारली होती.

abhijeet kelkarr

२०११ साली ‘बालगंधर्व’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि प्रचंड गाजला. या चित्रपटाचे दिग्दर्शन रवी जाधव यांनी केलं होतं तर या चित्रपटात सुबोध भावेने बालगंधर्व यांची भूमिका साकारली होती. या चित्रपटातील गाण्यांनी प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलं. त्याचबरोबर या चित्रपटातील कलाकारांचा अभिनय, चित्रपटातील संवाद यालाही प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. या चित्रपटात सुबोधने साकारलेली बालगंधर्वांची भूमिका आजही प्रेक्षकांच्या मनात आहे. तर त्या पाठोपाठ आता आणखी एक आघाडीचा अभिनेता बालगंधर्वांच्या भूमिकेत दिसणार आहे.

बालगंधर्व हे मराठी रंगभूमीवरील एक अद्वितीय गायक-अभिनेते म्हणून प्रसिद्ध आहेत. आपल्या गायनाने आणि अभिनयाने मराठी नाटक जगप्रसिद्ध करणारे ते एक असामान्य कलाकार होते. मराठी माणसाच्या हृदयात कायमस्वरूपी स्थान मिळवलेल्या व्यक्तींच्या यादीत बालगंधर्वांचा समावेश करावा लागेल. आता ‘कलर्स मराठी’वरील ‘योगयोगेश्वर जय शंकर’ या मालिकेत शंकर महाराजांच्या दिव्यत्वाचा अनुभव ज्यांनी याची देही याची डोळा घेतला त्या बालगंधर्वांच्या गोष्टीला सुरुवात होणार आहे. यात बालगंधर्वांच्या भूमिकेत मराठीतील एक आघाडीचा अभिनेता दिसणार आहे.

हेही वाचा : ‘कट्यार काळजात घुसली’ला ७ वर्ष पूर्ण होताच सुबोध भावेची मोठी घोषणा, पुन्हा प्रेक्षकांना देणार सांगीतिक मेजवानी

या मालिकेत अभिनेता अभिजीत केळकर बालगंधर्वांची भूमिका साकारताना दिसेल. अभिजीतने ‘बालगंधर्व’ चित्रपटात सदूभाऊ रानडे यांची भूमिका साकारली होती. तर आता तो या मालिकेत बालगंधर्वांच्या भूमिकेत दिसेल. नुकतेच त्याचे बालगंधर्वांच्या वेशभूषेतील काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

आणखी वाचा : मोठी मुलगी पायलट तर आता अलका कुबल यांच्या धाकट्या लेकीचीही कौतुकास्पद कामगिरी, आनंद व्यक्त करत म्हणाल्या…

या भूमिकेबद्दल बोलताना अभिजीत केळकर म्हणाला, “माझा पहिले विश्वासच बसत नव्हता. मला कधी स्वप्नात देखील नाही वाटलं मला याबद्दल विचारणा होईल. चित्रपट करत असताना कधीतरी, केव्हातरी ही भूमिका साकारण्याची संधी मिळेल असं वाटत होतं. कारण जे वैभव, सर्वार्थाने जे वैभव बालगंधर्व यांनी अनुभवलं, निर्माण केलं, ज्याचा अनुभव त्यांनी प्रेक्षकांना देखील दिला. असं एक उत्तुंग व्यक्तिमत्व साकारायला मिळणं हे स्वप्नवत आहे. माझ्यावर खूप मोठी जबाबदारी आहे, पण प्रेक्षकांना नक्की आवडेल याची खात्री आणि उत्सुकता आहे.”

मराठीतील सर्व टेलीव्हिजन ( Television ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 07-02-2023 at 17:49 IST
Next Story
महाअंतिम सोहळ्यापूर्वीच ‘बिग बॉस १६’च्या टॉप तीन सदस्यांची चर्चा, मराठमोळ्या शिव ठाकरेला स्थान मिळणार का?