सध्या सर्वत्र लग्नाचा माहोल आहे. अनेकजण विवाहबंधनात अडकत आहेत. सेलिब्रिटीही याला अपवाद नाहीत. गेल्या एका महिन्यात हिंदी आणि मराठी मनोरंजन सृष्टीतील अनेक कलाकार विवाह बंधनात अडकले आहेत, तर येत्या काळात काही लग्न करणार आहेत. आता या यादीत एका लोकप्रिय हिंदी अभिनेत्रीचा समावेश झाला आहे.

‘हप्‍पू की उलटन पलटन’ फेम अभिनेत्री कामना पाठक ही नुकतीच बोहल्यावर चढली आहे. तिने काल तिचा प्रियकर अभिनेता संदीप श्रीधरबरोबर लग्न केलं आहे. नागपूरमध्ये हा विवाहसोहळा संपन्न झाला. पारंपारिक मराठी पद्धतीने त्यांनी लग्न केलं. हा विवाहसोहळा चार दिवस रंगला. पहिले डोन् दिवस मेहेंदी, संगीत हे लग्नापूर्वीचे कार्यक्रम थाटामटात पार पडले.

आणखी वाचा : रणबीर कपूरला सतावते भविष्याची काळजी, लेकीचा उल्लेख करत म्हणाला, “ती २० वर्षांची होईल तेव्हा मी…”

तर लग्नाच्या दिवशी तिने सुंदर घागरा परिधान केला होता आणि त्या घागऱ्याला शोभेल अशी शेरवाणी संदीपने घातली होती. त्याचबरोबर त्याने फेटाही बांधला होता. या लग्नाला त्‍यांचे जवळचे नातेवाईक आणि इंडस्ट्रीमधील त्यांचे काही मित्र-मैत्रिणी उपस्थित होते. कामनाच्या आई वडिलांनी तिला वधूच्या लूकमध्ये बघताच त्यांना अश्रू अनावर झाले होते. तर कामनाही भावूक झाली होती. नागपूरमध्ये हा लग्नसोहळा संपन्न झाल्यावर कामनाच्या गावी इंदूरमध्ये एका रिसेप्शनचंही आयोजन करण्यात आलं होतं.

हेही वाचा : उर्वशी रौतेलाच्या घरी लगीनघाई, अभिनेत्री रंगली हळदीच्या रंगात

संदीप श्रीधरबाबत सांगताना कामना म्‍हणाली, “आम्‍ही अनेक वर्षांपासून रंगभूमीच्‍या माध्‍यमातून एकमेकांना ओळखत होतो आणि आमच्‍यामध्‍ये चांगली मैत्री देखील होती. कालांतराने आमच्‍यामध्‍ये प्रेम बहरू लागलं. संदीप खूप काळजी घेणारा व प्रोत्‍साहन देणारा आहे. त्‍याच्‍या या स्‍वभावामुळेच आमच्‍यामध्‍ये जवळीक निर्माण झाली आणि मी त्‍याच्‍या प्रेमात पडले. आम्‍हा दोघांना आमच्‍या कलेप्रती प्रेम व आवड आहे, ज्‍यामुळेच आम्‍ही एकत्र आलो. आम्‍ही पती-पत्‍नी म्‍हणून आमच्‍या नवीन जीवनप्रवासाला सुरूवात करण्‍यास खूपच उत्‍सुक आहोत.”