Tejaswini Lonari & Samadhan Sarvankar Engagement : मराठी मनोरंजनसृष्टीत लग्नसराई सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वीच अभिनेत्री अमृता माळवदकरचा विवाहसोहळा पार पडला होता. यानंतर नुकताच ‘भाग्य दिले तू मला’ फेम अभिनेता अमित रेखी व अभिनेत्री शिवानी नाईक यांचा साखरपुडा पार पडल्याचं पाहायला मिळालं. आता यांच्यापाठोपाठ मराठी कलाविश्वातील आणखी एक अभिनेत्री बोहल्यावर चढणार आहे. या अभिनेत्रीचं नाव आहे तेजस्विनी लोणारी.

‘तुझेच मी गीत गात आहे’, ‘देवमाणूस’ अशा गाजलेल्या मालिकांमध्ये झळकलेली अभिनेत्री तेजस्विनी लोणारी लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. ती निर्माती म्हणून देखील ओळखली जाते. तेजस्विनीने आजवर अनेक चित्रपटांमध्येही काम केलेलं आहे. याशिवाय ‘बिग बॉस मराठी’ या शोमध्येही ती सहभागी झाली होती. आता अभिनेत्रीने वैयक्तिक आयुष्यात एका नव्या प्रवासाची सुरुवात केली आहे.

तेजस्विनी लोणारीचा साखरपुडा रविवारी ( २६ नोव्हेंबर ) थाटामाटात पार पडला आहे. लग्नानंतर अभिनेत्री राजकीय घराण्याची सून होणार आहे. तेजस्विनी शिवसेना युवा नेते समाधान सरवणकर यांच्याशी लग्न करणार आहे. समाधान सरवणकर हे शिवसेना नेते सदा सरवणकर यांचे पुत्र आहेत.

तेजस्विनी आणि समाधान या दोघांचा साखरपुडा मुंबईतील आलिशान हॉटेलमध्ये पार पडला. या दोघांच्या साखरपुड्याला मनोरंजनविश्वातील अनेक कलाकारांनी उपस्थिती लावली होती.

साखरपुड्याला तेजस्विनीने पारंपरिक लूक केला होता. लाल रंगाची डिझायनर साडी, गळ्यात मोठा हार, हातात हिरव्या बांगड्यांचा चुडा या लूकमध्ये तेजस्विनी अतिशय सुंदर दिसत होती. या दोघांच्या साखरपुड्याला अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली होती. याशिवाय प्रसिद्ध अभिनेता सिद्धार्थ जाधव सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित होता.

आता तेजस्विनी लग्नबंधनात केव्हा अडकणार याची चाहते आतुरतेने वाट पाहत आहे. सध्या सोशल मीडियावर तेजस्विनीच्या साखरपुड्याचे फोटो व व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहेत.

दरम्यान, तेजस्विनीने मालिकांसह ‘दोघांत तिसरा आता सगळं विसरा’, ‘गुलदस्ता’, ‘अफलातून’ अशा अनेक चित्रपटांमध्ये देखील काम केलेलं आहे.