Aishwarya Narkar Shri Satyanarayan Pooja : श्रावण महिना भगवान शिवशंकराला समर्पित व पवित्र मानला जातो. हा महिना धार्मिक उपक्रमांसाठी महत्त्वाचा मानला जातो. श्रावणी सोमवार, मंगळागौर पूजनासह श्रावणात रुद्राभिषेक, सत्यनारायण पूजा, वास्तुशांती, गृहप्रवेशाची पूजा असे धार्मिक उपक्रम आयोजित केले जातात. गेल्या काही दिवसांत मराठी कलाविश्वातील अनेक सेलिब्रिटींच्या घरी देखील श्रावणातील सत्यनारायण पूजा पार पडल्याचं पाहायला मिळालं.

लोकप्रिय अभिनेत्री ऐश्वर्या नारकर यांच्या घरी दरवर्षी सत्यनारायण पूजेचं आयोजन केलं जातं. पूजेच्या दिवशी अभिनेत्री सगळी तयारी स्वत: करतात. याशिवाय युट्यबवर व्हिडीओ शेअर करत ऐश्वर्या नारकरांनी प्रसादाच्या शिऱ्याची रेसिपी सर्वांना दाखवली आहे. अतिशय भक्तिमय वातावरणात नारकर जोडप्याच्या घरची सत्यनारायण पूजा पार पडली.

ऐश्वर्या नारकर म्हणतात, “आमच्याकडे नुकतीच सत्यनारायण पूजा पार पडला. त्यामुळे मी माझ्या नव्या इरकल साडीची घडी मोडली होती. पूजेची तयारी, प्रसादाची तयारी हे सगळं झाल्यावर मी स्वत:ची तयारी करायला घेतली होती, अगदी लाइट मेकअप सुद्धा केला होता. आमची ही घरगुती पूजा होती, त्यामुळे फार कोणी पाहुणे येणार नव्हते. साडी, केसात गजरा, हातात मॅचिंग बांगड्या घालून मी तयार झाले होते. काही वेळाने गुरुजी आले आणि पूजेला सुरुवात झाली. पूजेचे मंत्र सुरू झाल्यावर संपूर्ण घरात अगदी प्रसन्न वाटतं. आमच्याकडे विष्णूची चांदीची मूर्ती आहे तिची आम्ही पूजा करतो.”

“सत्यनारायण पूजेदरम्यान एक खूप गोड गोष्ट घडली. ती म्हणजे, तुळजाभवानी देवी आमची कुलदेवता आहे. आरती झाल्यावर देवीच्या मूर्तीचं आमच्या घरी आगमन झालं. यानंतर अभिषेक करून आम्ही मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली.” यानंतर ऐश्वर्या व अविनाश नारकर या दोघांनी मिळून आरती केली आणि अशारितीने त्यांच्या घरची पूजा पार पडली.

दरम्यान, ऐश्वर्या नारकरांनी या व्हिडीओला ‘सत्यनारायण प्रसन्न’ असं कॅप्शन दिलं आहे. तितीक्षा तावडेने या व्हिडीओवर “अतिसुंदर” अशी कमेंट केली आहे. तर, सुरुची अडारकरने “खूप छान” असं कमेंट्समध्ये म्हटलं आहे. याशिवाय अभिनेत्रीच्या अन्य चाहत्यांनी सुद्धा आपली परंपरा, संस्कृती जपल्यावर नारकर जोडप्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.