मराठमोळी अभिनेत्री ऋतुजा बागवे हिंदी मालिकेत मुख्य भूमिकेत झळकणार आहे. आजपासून स्टार प्लस वाहिनीवर ‘माटी से बंधी डोर’ ही नवीन मालिका सुरू होत आहे. या मालिकेत या नवीन शोमध्ये ऋतुजा बागवे वैजंती नावाचं पात्र साकारतेय, तर ‘उडारियां’ फेम अंकित गुप्ता रणविजय नावाची मराठी मुलाची भूमिका साकारणार आहे. या शोमध्ये इतरही अनेक कलाकार झळकणार आहेत.

महाराष्ट्रातील कोल्हापूरच्या पार्श्वभूमीवर आधारित ही मालिका आहे. यात वैजूचा संघर्ष आणि प्रवास दाखवण्यात येईल, जी शेतात काम करून पैसे कमवते आणि तिच्या कुटुंबाला हातभार लावते. कुटुंबासाठी झटणारी, मेहनती वैजूला तिच्या गावासाठी व लोकांचं आयुष्य सुधारावं यासाठी काम करायचं आहे, पण नियतीच्या काही वेगळेच प्लॅन्स आहेत. याच वैजुच्या आयुष्यात नंतर रणविजयची एंट्री होईल आणि नंतर या दोघांची प्रेम कहाणी दाखवण्यात येईल, असं या मालिकेचं कथानक आहे.

“नागराजसारखा माणूस मित्र म्हणून आपल्या आयुष्यात असावा, कारण…”; अभिनेत्री छाया कदम यांचे वक्तव्य

मराठी शिकतोय अंकित गुप्ता

या मालिकेत अंकित गुप्ता मराठी मुलाच्या भूमिकेत दिसणार आहे. अंकित गुप्ता पहिल्यांदाच एका महाराष्ट्रीय तरुणाची भूमिका साकारताना दिसणार आहे. अंकित हा मूळचा उत्तर भारतातला आहे, त्यामुळे त्याला मराठी येत नाही. पण या भूमिकेला न्याय देण्यासाठी तो मराठी शिकत आहे.

अंकित म्हणाला, “मी रणविजय नावाचे पात्र साकारत आहे, जो मराठी मुलगा आहे. मी पहिल्यांदाच एका महाराष्ट्रीय तरुणाची व्यक्तिरेखा साकारणार आहे. रणविजयच्या पात्राला न्याय देता यावा, यासाठी मी मराठी शिकत आहे. मराठी भाषा शिकणं ही अडचण नाही, तर भाषेचे उच्चारण आणि संवादफेक शिकण्यात आहे. मालिकेतील इतर सगळे कलाकार मराठी भाषेशी परिचित असल्याने माझ्यासाठी ही भाषा शिकणं एक मजेदार अनुभव आहे. रोज मी मराठीतील नवनवीन शब्द शिकत आहे.”

मेचा शेवटचा आठवडा असणार धमाकेदार, OTT वर येतायत जबरदस्त वेब सीरिज अन् चित्रपट, वाचा यादी!

ऋतुजाच्या मालिकेचं जान्हवी कपूरच्या बॉयफ्रेंडशी कनेक्शन

‘माटी से बंधी डोर’ ही नवीन मालिका स्टार प्लस वाहिनीवर आज (२७ मे ) पासून रोज संध्याकाळी साडेसात वाजता प्रसारित होईल. या मालिकेचं जान्हवी कपूरशी कनेक्शन आहे. जान्हवीचा बॉयफ्रेंड शिखर पहारियाची आई स्मृती शिंदे यांनी या मालिकेची निर्मिती केली आहे. स्मृती या महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या कन्या आहेत. या मालिकेचा प्रोमो शेअर करत जान्हवी कपूरने स्मृती शिंदे यांना शुभेच्छा दिल्या होत्या. तिने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर ही मालिका पाहण्याची चाहत्यांना विनंती केली.