Colors Marathi : महाराष्ट्रभूषण अशोक सराफ यांना नुकताच राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला. आजवर त्यांनी जवळपास २५० हून अधिक चित्रपटांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. याशिवाय हिंदी कलाविश्वातही त्यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. कला क्षेत्रातील याच उल्लेखनीय कार्यासाठी अशोक सराफ यांचा सन्मान करण्यात आला.

पद्मश्री पुरस्कार मिळाल्यावर अशोक सराफ यांच्यावर संपूर्ण कलाविश्वातून कौतुकाचा वर्षाव करण्यात येत आहे. सध्या ते ‘कलर्स मराठी’ वाहिनीवरील ‘अशोक मा.मा.’ या मालिकेत प्रमुख भूमिका साकारत आहे. पद्मश्री पुरस्काराने सन्मान झाल्यावर मालिकेच्या सेटवर देखील त्यांचं खास स्वागत करण्यात आलं. ‘अशोक मा.मा.’ मालिकेच्या टीमने अभिनेत्यांसह केक कापला आणि सेलिब्रेशन केलं. याशिवाय ‘कलर्स मराठी’ वाहिनीने त्यांच्यासाठी खास पत्र लिहिलं आहे. हे पत्र ‘कलर्स मराठी’ने इन्स्टाग्रामवर शेअर केलं आहे.

‘कलर्स मराठी’ वाहिनीने अशोक सराफ यांच्यासाठी लिहिलं खास पत्र

पद्मश्री अशोक सराफ मामा,
सप्रेम शुभेच्छा आणि मन:पूर्वक अभिनंदन!
आपल्या देदीप्यमान बहुमूल्य अभिनय कारकिर्दीतील शिखरावर एक नवा राजमुकूट विराजमान झाला… तुम्हाला भारत सरकारतर्फे पद्मश्री पुरस्कार मिळाला! या सर्वोच्च सन्मानामुळे आपल्यावर मनापासून प्रेम करणाऱ्या प्रत्येक चाहत्याचा उर अभिमानाने भरून आला आहे. ‘कलर्स मराठी’ परिवाराचे ज्येष्ठ सदस्य म्हणून आपली ही गौरवशाली कामगिरी आमच्यासाठी एक अभिमानाचा क्षण आहे. आपल्या अलौकिक व्यक्तिमत्त्वाचा स्पर्श आजही आमच्या प्रेक्षकांपर्यंत दररोज पोहोचवणं, हे आमचं आम्ही भाग्य समजतो. या अत्युच्च राष्ट्रीय सन्मानासाठी आमच्या संपूर्ण टीमकडून हार्दिक अभिनंदन आणि आगामी आनंदमय वाटचालीस कलर्स मराठी परिवाराकडून मन:पूर्वक शुभेच्छा!
आपला स्नेहांकित,
कलर्स मराठी परिवार…

‘अशोक मा.मा.’ मालिकेच्या सेटवर केलेल्या सेलिब्रेशनचे फोटो ‘कलर्स मराठी’च्या इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आले आहेत. यावर निवेदिता यांनी, “थँक्यू कलर्स मराठी आणि अशोक मामा टीम” अशी कमेंट करत सर्वांचे आभार मानले आहेत.

दरम्यान, यंदा राष्ट्रपती भवनात पार पडलेल्या सोहळ्यात विविध क्षेत्रातील मान्यवरांना पद्म पुरस्कार प्रदान केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपराष्ट्रपती जगदीप धनखड, केंद्रीय मंत्री अमित शहा, एस. जयशंकर, प्रल्हाद जोशी, जितेंद्र सिंह, जी. किशन रेड्डी आणि इतर अनेक मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते.