Bigg Boss 19 Pranit More Eviction Updates : ‘बिग बॉस १९’ च्या सेटवरून एक मोठी अपडेट समोर आली आहे. ज्यामुळे शोच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. यंदा ‘बिग बॉस’च्या घरात प्रणित मोरे हा एकमेव मराठी स्पर्धक सहभागी झाला होता. स्टँडअप कॉमेडियन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रणित मोरेने अल्पावधीतच सर्वांची मनं जिंकून घेतली. सोशल मीडियावर सर्वत्र त्याची क्रेझ निर्माण झाली. त्याला चाहते ‘महाराष्ट्रीयन भाऊ’ म्हणून देखील ओळखतात.

यंदाचं पर्व काही करुन प्रणित जिंकला पाहिजे अशी देशभरातील अनेक ‘बिग बॉस’ प्रेमींची इच्छा होती. तो घरातही उत्तम खेळत होता. त्याचा स्वभाव, गेम खेळण्याची पद्धत, खरेपणा या गोष्टी सर्वांना भावल्या होत्या. त्यामुळे प्रणितला अनेक सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सनी सुद्धा पाठिंबा दिला होता. मात्र, ‘बिग बॉस’च्या सेटवरून नुकतीच एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे.

सलमान खान ‘वीकेंड का वार’च्या एपिसोडचं सलग शूटिंग करतो आणि त्यानंतर टीव्हीवर हे भाग प्रसारित केले जातात, त्यामुळे सेटवरच्या बऱ्याच अपडेट्स चाहत्यांमध्ये आधीच लीक होतात. प्रणित मोरे या आठवड्याच्या ‘वीकेंड का वार’मध्ये एलिमिनेट झाला आहे अशी माहिती सूत्रांनी दिली असून सोशल मीडियावर सर्वत्र ही बातमी कन्फर्म असल्याचं बोललं जात आहे.

प्रणित व्होटिंग ट्रेंड्समध्ये सुद्धा आघाडीवर होता. असं असताना, तो इतक्या लवकर घराबाहेर कसा होऊ शकतो? असा प्रश्न त्याच्या अनेक चाहत्यांना पडला होता. मात्र, प्रणित कमी व्होटिंगमुळे नव्हे तर प्रकृतीच्या कारणास्तवर शोमधून एलिमिनेट झाला आहे. इन्फ्लुएन्सर जिविका सिंगने सुद्धा याबाबत अपडेट शेअर केली आहे. मेडिकल इमर्जन्सीमुळे प्रणितला हा शो सोडावा लागला असं तिने व्हिडीओ शेअर करत म्हटलं आहे.

अनेकांनी प्रणित मोरे सिक्रेट रूममध्ये जाईल असाही दावा सोशल मीडियावर केला आहे. मात्र, सध्या तो सिक्रेट रूममध्ये नसून त्याला रुग्णालयात नेण्यात आलं आहे, अशी अपडेट प्रणितच्या फॅन पेजेसनी शेअर केली आहे.

आता प्रणित मोरेच्या बाबतीत कोणता निर्णय घेतला जाणार हे आज एपिसोड ऑन एअर झाल्यावर स्पष्ट होईल. पण, खरंच प्रणित आरोग्याच्या कारणास्तव घराबाहेर गेला असेल तर तो पुन्हा शोमध्ये येणार का? हा प्रश्न देखील चाहते विचारू लागले आहेत. प्रणित घराबाहेर होणं हा सर्वात Unfair निर्णय आहे अशा पोस्ट सध्या त्याच्या चाहत्यांकडून व्हायरल करण्यात येत आहे. एकंदर त्याच्या एलिमिनेशनची बातमी समोर येताच सर्वत्र नाराजीचा सूर उमटला आहे.