Abhishek Bajaj Talks About Ashnoor Kaur : ‘बिग बॉस १९’मधून नुकताच अभिनेता अभिषेक बजाज बाहेर पडला. ‘बिग बॉस’च्या घरात असताना अभिषेक कायम चर्चेत असायचा. त्यामध्ये अशनूर कौरबरोबरचा बाँड हेही त्यापैकी एक कारण असायचे. अलीकडे तो त्याच्या खासगी आयुष्यामुळेही चर्चेत आला. अशातच आता घराबाहेर आल्यानंतर त्याने याबद्दल प्रतिक्रिया दिली आहे.

प्रणित मोरेने अशनूरला सुरक्षित केल्यामुळे अभिषेकचा ‘बिग बॉस’च्या घरातील प्रवास संपला आणि त्याला घराबाहेर पडावे लागले. ‘बिग बॉस’च्या घराबाहेर आल्यानंतर त्याने प्रणित मोरे, कुनिका सदानंद, अशनूर कौर आणि घरातील इतर स्पर्धकांबद्दल प्रतिक्रिया दिल्या. यावेळी त्याला अशनूरबरोबरच्या नात्याबद्दल विचारल्यानंतर त्याने त्यांच्यामध्ये फक्त मैत्री असल्याचे म्हटले आहे.

‘बिग बॉस’च्या घरात अभिषेक व अशनूर यांच्यामध्ये अनेक गप्पा होत असायच्या. ते दोघे अनेकदा एकमेकांबरोबर असायचे. घरातील स्पर्धकही त्यांना चिडवायचे; परंतु त्यांनी कधीच याबद्दल कुठहीली प्रतिक्रिया दिली नाही. पण, आता घराबाहेर आल्यानंतर अभिषेकला मुलाखतीत याबद्दल विचारल्यानंतर त्याने पहिल्यांदाच त्यांच्या नात्याबद्दल स्पष्टपणे प्रतिक्रिया दिली आहे.

अभिषेक बजाजची प्रतिक्रिया

‘झूम’शी संवाद साधताना तो म्हणाला, “नाही; आमच्यामध्ये फक्त मैत्री आहे. आम्ही केवळ एकमेकांचे मित्र आहोत. प्रेम ही खूप मोठी भावना आहे. प्रेम करायला का भीती वाटायला हवी. प्रेम ही तर ताकद असते. अजून तसा कुठलाही विचार नाहीये.” अभिषेकने पुढे अशनूरने या पर्वाची ट्रॉफी जिंकावी, अशी इच्छा व्यक्त केली आहे. यावेळी त्याने सोशल मीडियावर अशनूर व त्याच्या नावाच्या म्हणजेच अभिशनूर अशा हॅशटॅगच्या रील पाहायला मिळत असून, या रील त्याला आवडत असल्याचे त्याने म्हटले आहे.

अभिषेक पुढे रुल ब्रेक कॉन्ट्रोव्हर्सी आणि एलिमिनेशनबद्दल म्हणाला, “खरं सांगायचं तर आमच्याकडून चूक झाली होती आणि मी ती नाकारत नाहीये. पण, मला असं वाटतं की, एलिमिनेशन यासाठी खूप मोठी शिक्षा आहे. हे नॉमिनेशन नव्हतं, तर एलिमिनेशनच होतं. चुका माणसांकडूनच होतात.”