Bigg Boss Marathi 5वे पर्व सतत कोणत्या ना कारणाने चर्चेत असते. कधी घरातील स्पर्धकांची भांडणे, वाद-विवाद, तर कधी बिग बॉसने दिलेला टास्क यांमुळे हे पर्व सातत्याने चर्चेत असते. ‘कलर्स मराठी’ वाहिनीने सोशल मीडियावर एक प्रोमो शेअर केला आहे, ज्यामध्ये बिग बॉसने स्पर्धकांना कॅप्टन्सी टास्क दिल्याचे पाहायला मिळत आहे.
बिग बॉसच्या स्टॉपवरून सुटणार ‘कॅप्टन्सी कंटेन्डर’ची बस
‘कलर्स मराठी’ वाहिनीने सोशल मीडियावर एक प्रोमो शेअर केला आहे. घरातील नवीन कॅप्टन निवडण्यासाठी स्पर्धकांना एक टास्क खेळायचा आहे. या टास्कचे नाव ‘कॅप्टन्सी कंटेन्डर’ असे आहे. बिग बॉसच्या स्टॉपवरून सुटणार कॅप्टन्सी कंटेन्डरची बस, असे प्रोमोमध्ये म्हटले आहे. गार्डन परिसरात एक मोठा बॉक्स ठेवला असून, त्यावर बीबी तिकीटघर असे लिहिले आहे. त्या बॉक्ससमोर सर्व स्पर्धक एका ओळीत उभे असून त्यांच्यासमोर काही खुर्च्या ठेवल्या आहेत.
अंकिता वालावलकर पंढरीनाथ कांबळेला म्हणते, “पॅडीदादा गणपतीत गावाला जायचे आहे, कन्फर्म तिकीट पाहिजे.” त्यावर पंढरीनाथ म्हणतो, “माझी बुक आहे.” त्यानंतर अरबाज, “घन:श्यामपेक्षा मी चांगली कॅप्टन्सी करू शकतो”, असे म्हणताना दिसत आहे. त्यावर अभिजीत सावंत म्हणतो, “का घन:श्याम कॅप्टन नाही होऊ शकत?” त्यानंतर घनश्याम आणि पंढरीनाथ या दोघांत संवाद रंगल्याचे दिसत आहे. पंढरीनाथ घन:श्यामला म्हणतो, “गुच्चा मारीन मी तुला.” त्यावर घन:श्याम म्हणतो, “जवळच्या लोकांनी गुच्चा मारलाय तो काय कमी आहे का?” त्याच्या या बोलण्यावर पंढरीनाथसह इतर स्पर्धक हसताना दिसत आहेत.
हा प्रोमो शेअर करताना कलर्स मराठी वाहिनीने, “बीबीच्या स्टॉपवरून निघणार कॅप्टन्सीची बस, कोणाला तिकीट मिळणार, कोणाची बस सुटणार?”, असे म्हटले आहे.
याआधी बिग बॉसने घरातील स्पर्धकांना एक टास्क दिला होता. त्यामध्ये घरातील सदस्यांना बीबी फार्म सांभाळायचे होते. या टास्कमध्ये स्पर्धकांनी आक्रमकपणा दाखवला होता. त्यामुळे या टास्कची मोठी चर्चा झाली होती. आता या कॅप्टन्सी टास्कमध्ये कोणता स्पर्धक बाजी मारणार आणि घराचा नवा कॅप्टन होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
बिग बॉसच्या घरातील कॅप्टन झाल्यामुळे त्या स्पर्धकाला इतरांपेक्षा जास्त अधिकार मिळतात. काही निर्णय घेण्याची मुभा बिग बॉसकडून दिली जाते. त्याबरोबरच पुढच्या नॉमिनेशन टास्कमध्ये कॅप्टनचे नाव घेता येत नाही. त्यामुळे कॅप्टन होण्याकडे स्पर्धकांचा कल असतो.
दरम्यान, जेव्हा ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाला सुरुवात झाली, त्यावेळी निक्की तांबोळीने वर्षा उसगांवकर यांचा अपमान केल्यामुळे अनेक कलाकारांनी संताप व्यक्त केला होता. आता पुन्हा एकदा निक्की तांबोळीने वर्षा उसगांवकर यांचा अपमान केल्याने अनेक कलाकारांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करीत निक्कीच्या वागण्यावर टीका केली आहे. आता या आठवड्याच्या शेवटी भाऊच्या धक्क्यावर रितेश देशमुख यावर निक्कीला काय बोलणार हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक असल्याचे सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे.
© IE Online Media Services (P) Ltd