Dhananjay Powar And Jahnavi Killekar Funny Video Viral : ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या सीझनमुळे धनंजय पोवार म्हणजेच सर्वांचा लाडका डीपी दादा आणि अभिनेत्री जान्हवी किल्लेकर यांच्यात चांगली मैत्री झाली. दोघंही सुरुवातीला एकमेकांच्या विरोधात खेळत होते. मात्र, शेवटचे काही आठवडे बाकी राहिलेले असताना जान्हवीने आपला खेळ बदलला आणि सगळ्यांशी मैत्री केल्याचं पाहायला मिळालं होतं.

आता ही ‘बिग बॉस’ची जोडी पुन्हा एकदा रील्सच्या निमित्ताने एकत्र आली आहे. अभिनेत्री जान्हवी किल्लेकर मध्यंतरी डीपी दादाच्या नव्या दुकानाच्या उद्घाटनाला कोल्हापुरात पोहोचली होती. आता या भावा-बहिणीच्या जोडीने एक मजेशीर व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

यामध्ये धनंजय पोवार जान्हवीला म्हणतात, “मी तुझ्यासाठी एक कविता लिहिलीये ऐक हा…”

“बिग बॉसच्या घरामध्ये एक चेहरा निराळा
जिच्या सौंदर्याने मन मोहरून गेलं
अंधाराची ती हसरी कमान
जणू चांदण्यांची झालर
प्रत्येक स्पर्धेत तिची वेगळीच लहर”

ही कविता ऐकून जान्हवी डीपी दादाचं कौतुक करत म्हणते, “वाह वाह वाह, हे माझ्यासाठी लिहिलंय तुम्ही… अगं माझा दादा तो” पुढे, डीपी दादा तिला आणखी एक कविता ऐकवतात.

“जान्हवी तुझे रूप, जणू उगवती उषा
डोळ्यात तुझ्या दिसते एक वेगळीच आशा
शांत आणि सुंदर तरी बोलण्यात धार
रूप तुझे पाहून हरपतो शब्दांचा आधार”

यावर, “किती गोड थँक्यू दादा…” असं म्हणत जान्हवी धनंजयचं कौतुक करते. आता व्हिडीओच्या शेवटी डीपी तिच्यासाठी आणखी एक कविता म्हणतो.

“केसांची ती बटा, जेव्हा गालावर रुळते
प्रत्येकक्षणी नवी एक जान ती भरते
मराठमोळं तेज अन् अदा दिलखेचक
तुझ्या रुपाची सर नाही कशाला येत
अशी तू बहरलेली या घराची राणी
तुझ्या सौंदर्याची गाथा शब्दांत मांडू मी किती
हीच ती अधुरी कहाणी”

ही कविता पूर्ण झाल्यावर जान्हवी काहिशी चिडते आणि डीपीला म्हणते, “आणि हे सगळं ऐकून तुला पायतानानं हाणल आमची वहिनी” म्हणजेच तुम्ही अशाप्रकारच्या कविता लिहिताय हे मी वहिनींना जाऊन सांगेन अशी धमकी जान्हवी धनंजयला देते.

दरम्यान, धनंजय-जान्हवीच्या या मजेशीर व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. “डीपी दादा आता तुमचं काही खरं नाही”, “आईसाहेबांपासून सावधान…आता मार खाशील DP दादा”, “वहिनी लवकर कमेंट करा या व्हिडीओवर”, “आता दादाला चार दिवस जेवण मिळणार नाही”, “जेवण बंद…वहिनींना सांगितलंय” अशा प्रतिक्रिया या व्हिडीओवर चाहत्यांनी केल्या आहेत.