‘बिग बॉस मराठी’ या कार्यक्रमामुळे अभिनेता जय दुधाणे घराघरांत लोकप्रिय झाला. नुकतीच त्याने मराठी मालिकाविश्वात एन्ट्री घेतली. सगळं काही सुरळीत चालू असताना अभिनेत्याच्या वैयक्तिक आयुष्याबाबत एक दु:खद बातमी समोर आली आहे. जय दुधाणेला पितृशोक झाला आहे. त्याच्या वडिलांचं हृदय बंद पडल्याने (कार्डिअ‍ॅक अरेस्ट) निधन झालं आहे. याबाबत जयने भावुक पोस्ट शेअर करत त्याच्या सर्व चाहत्यांना माहिती दिली आहे. अभिनेत्याच्या वडिलांवर आज अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जय लिहितो, “कधीच वाटलं नव्हतं मला तुमच्याबरोबर ही गोष्ट शेअर करावी लागेल. २४ जूनच्या मध्यरात्री मी माझा सुपरहिरो हृदय बंद पडल्यामुळे (कार्डिअ‍ॅक अरेस्ट) गमावला. हा सुपरहिरो केवळ आमच्या कुटुंबीयांसाठीच नव्हे तर ओळखीच्या प्रत्येक माणसासाठी खूप महत्त्वाचा होता. त्यांना नेहमी त्याचा प्रामाणिकपणा आणि कायम मदतीसाठी तयार असणारा स्वभाव यासाठी ओळखलं जायचं. सामाजकार्य करणं ही त्यांची आवड होती. कधीही ते पैशांच्या मागे गेले नाहीत, त्यांनी कायम एक चांगला माणूस बनण्याचा प्रयत्न केला. माझे सर्व मित्र त्यांना अनिक काका बोलायचे तर, त्यांचे सगळे मित्र त्यांना अनिल भाई म्हणायचे. माझ्या वडिलांना ओळखणारे सगळे त्यांना आता शेवटचं पाहू शकतात. ते नेहमीच आपल्या सगळ्यांच्या हृदयात आणि मनात कायम राहतील. पण, यापुढे २४ जून हा माझ्या आयुष्यातील सर्वात वाईट दिवस असेल. कारण, मी फक्त माझे वडील नाहीतर माझा एक सच्चा मित्र, माझे पालक आणि एका खऱ्या माणसाला गमावलं आहे.”

हेही वाचा : Maharaj Review : वादात अडकलेला ‘महाराज’ कसा आहे? आमिर खानच्या मुलाचा पदार्पणाचा चित्रपट पाहावा की नाही? वाचा

“खरा आणि सच्चा माणूस काय असतो याचं उत्तम उदाहरण माझे वडील होते. चांगला माणूस म्हणजे काय याची जणू ते व्याख्याच होते. मी तुम्हा सर्वांना विनंती करतो की, उद्या त्यांना शेवटचा निरोप देण्यासाठी उपस्थित राहा…पप्पा माझं तुमच्यावर कायम प्रेम असेल… तुम्ही जिथे असाल तिथे देव तुमच्या पाठिशी राहो आणि तुमचं नेहमी कल्याण करो. तुम्ही कायम माझ्या हृदयात असाल. लव्ह यू फॉरएव्हर पप्पा…माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे” अशी भावुक पोस्ट जय दुधाणेने इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे.

जयने ही पोस्ट शेअर करताच कलाविश्वातील त्याच्या जवळच्या मित्रमंडळींनी अभिनेत्याच्या वडिलांना श्रद्धांजली अर्पण करत दु:ख व्यक्त केलं आहे. विकास पाटील, किरण गायकवाड, सोहम बांदेकर, पूर्वा शिंदे, पलक यादव, शिवम शर्मा, आरोह वेलणकर, गायत्री दातार, उत्कर्ष शिंदे, दिव्या अग्रवाल, सोनाली पाटील असे सगळेच कलाकार जयच्या पाठिशी या कठीण प्रसंगात खंबीरपणे उभे राहिले आहेत.

हेही वाचा : ५८ वर्षांचा सलमान खान अजूनही अविवाहित का? त्याचे वडील सलीम खान म्हणाले, “तो सहज आकर्षित होतो, पण…”

दरम्यान, जय दुधाणेच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर ‘Splitsvilla’ या कार्यक्रमामुळे तो सर्वत्र लोकप्रिय झाला. यानंतर त्याने ‘बिग बॉस मराठी’च्या घरात एन्ट्री घेतली. सध्या जय ‘येड लागलं प्रेमाचं’ या मालिकेत खलनायकाची भूमिका साकारत आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bigg boss marathi fame jay dudhane father passed away actor shared emotional post sva 00