Suraj Chavan : सूरज चव्हाण येत्या २९ नोव्हेंबरला बोहल्यावर चढणार आहे. त्याआधी या ‘गुलीगत किंग’ने नवीन घरात गृहप्रवेश केला आहे. सध्या सूरजच्या आलिशान अशा नव्या घराचा व्हिडीओ सोशल मीडियावर सर्वत्र व्हायरल होत आहे. सूरज चव्हाण ‘बिग बॉस मराठी’चा विजेता झाल्यावर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्याला हक्काचं घर बांधून देईन असा शब्द दिला होता. यानंतर अवघ्या काही दिवसांतच सूरजच्या घराचा भूमिपूजन सोहळा पार पडला.
याशिवाय काही महिन्यांपूर्वी अजित पवार यांनी स्वत: सूरजच्या घराचं बांधकाम कसं चालूये याची पाहणी सुद्धा केली होती. आता ‘गुलीगत किंग’ची स्वप्नपूर्ती झालेली आहे. लग्नाआधी सूरज चव्हाणने नव्या घरात गृहप्रवेश केला आहे. सूरज या नव्या घरात त्याच्या पत्नीचं धुमधडाक्यात स्वागत करणार आहे.
सूरज चव्हाणच्या घरची परिस्थिती अतिशय बेताची होती. बालपणी आई-बाबांचं छत्र हरपल्यामुळे त्याच्या बहिणींनी त्याचा सांभाळ केला. स्वत:चं घर असावं असं त्याचं स्वप्न होतं, बिग बॉसमध्ये देखील अनेकदा त्याने ही इच्छा बोलून दाखवली होती. “अखेर आज अजितदादांमुळे हक्काच्या घराचं स्वप्न पूर्ण झालं” अशा भावना व्यक्त करत सूरजने खास पोस्ट शेअर केली आहे.
सूरज चव्हाण पोस्ट शेअर करत लिहितो, “माझ्या नव्या घरात गृहप्रवेश केला… आदरणीय अजितदादा पवार…फक्त तुमच्यामुळे माझ्यासारख्या एका सामान्य तरुणाला हक्काचं घर मिळालं. आपण नेहमी माझ्यासारख्या गोरगरीबाच्या मदतीला येता. यापुढे देखील असेच अनेकांच्या मदतीस याल अशी मला खात्री आहे. यात हस्ते परहस्ते मदत करणाऱ्यांचे देखील मन:पूर्वक आभार!”
सूरजने शेअर केलेल्या नव्या घराच्या व्हिडीओवर त्याच्या चाहत्यांसह सेलिब्रिटींनी कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. याशिवाय अजित पवार यांनीही या गृहप्रवेशाच्या व्हिडीओवर “सूरज, नवीन घरासाठी आणि भावी आयुष्यासाठी तुला खूप शुभेच्छा!” अशी प्रतिक्रिया दिली आहे.
दरम्यान, सूरज व संजना यांचा विवाहसोहळा येत्या २९ नोव्हेंबरला पार पडणार आहे. गुलीगत किंगच्या लग्नसोहळ्याला आता कोण-कोण हजेरी लावणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.
