Hina Khan On Battle With Breast Cancer : ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ मधील अक्षराच्या भूमिकेसाठी हिना खान ओळखली जाते. या मालिकेमुळे हिना खान घराघरात पोहोचली. अनेक मालिकांमध्ये हिनाने काम केलं आहे. हिंदी टेलिव्हिजनचा ती लोकप्रिय चेहरा आहे.

गेल्याच वर्षी हिनाला ब्रेस्ट कॅन्सरचं निदान झालं होतं. ज्यामुळे तिचं आयुष्यच पूर्णपणे बदलून गेलं. पण, तरीही हिना थांबली नाही किंवा तिने करिअरला ब्रेक दिला नाही. आता तिची प्रकृती पूर्वीपेक्षा चांगली आहे. ती इतरांना प्रेरणा देत राहते. अलिकडेच, अभिनेत्रीने कर्करोगाबद्दल प्रतिक्रिया दिली आहे.

हिना खानने एएनआय या वृत्तसंस्थेला सांगितले की, “कर्करोगाच्या रुग्णांनी घरी बसून राहावे आणि त्यांचे आयुष्य संपले आहे, असा विचार करावा, हा दृष्टीकोण चुकीचा आहे. काही दिवस नक्कीच कठीण असतात, परंतु त्यानंतर तुम्ही कामावर परत येऊ शकता. यासाठी तुम्हाला धैर्य, शक्ती आणि तुमच्या कुटुंबाचे प्रेम आवश्यक आहे. जोपर्यंत माझे शरीर मला साथ देत आहे तोपर्यंत मी नेहमीच अभिनय करेन.”

हिना पुढे म्हणाली की कठीण दिवस कमी असतात, परंतु खरी मदत इच्छाशक्ती, मानसिक बळ आणि कुटुंबाच्या प्रेमातून मिळते. ती म्हणाली, “तुमचे मानसिक बळ सर्वात महत्वाचे आहे. म्हणून स्वतःला मानसिकदृष्ट्या मजबूत ठेवा आणि आनंदी राहा.

रुग्णालयात वाढदिवस केला साजरा

काही दिवसांपूर्वी, हिना खानने उपचार घेत असताना रुग्णालयात तिचा वाढदिवस साजरा केला. तिने तिच्या धाडसाची एक झलक इन्स्टाग्रामवर शेअर केली. फोटोबरोबर तिने लिहिले, “ही ती मुलगी आहे जी काहीही झाले तरी हसते… काय सांगू? आज हा फोटो कोणत्या परिस्थितीत आणि कुठे काढला गेला? आपल्याला फक्त प्रत्येक परिस्थितीत आनंदी राहावे लागते, काहीही झाले तरी. वाढदिवसाच्या शुभेच्छा, क्यूटी.”

हिनाने गेल्या वर्षी जूनमध्ये इन्स्टाग्रामवर भावनिक पोस्टद्वारे तिच्या आजाराची माहिती दिली होती. तिने लिहिले होते, “मला तिसऱ्या टप्प्यातील स्तनाचा कर्करोग आहे… मी मजबूत, दृढनिश्चयी आणि या आजाराला हरवण्यासाठी तयार आहे.” अडचणी असूनही, हिना लाखो लोकांना प्रेरणा देत आहे आणि ती पुन्हा कामावर परतली आहे. ती सध्या तिचा पती रॉकी जयस्वालबरोबर ‘पती पत्नी और पंगा’ या रिअॅलिटी शोमध्ये दिसत आहे.