Hina Khan Slams Bigg Boss 19 Contestant Farrhana Bhatt : ‘बिग बॉस १९’ आणि त्यातील स्पर्धक ‘बिग बॉस’च्या घरात घडलेल्या गोष्टींमुळे चर्चेत असतात. अनेकदा टास्कदरम्यान त्यांच्यात वाद निर्माण होतात. काही वेळा स्पर्धक एकमेकांच्या खासगी आयुष्याबद्दल तसेच कारकिर्दीबद्दलही बोलतात. असंच काहीसं ‘बिग बॉस १९’च्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या भागात घडलं, ज्यानंतर हिना खानने सोशल मीडियावर याबद्दल प्रतिक्रिया दिली.
‘बिग बॉस १९’च्या घरात नुकत्याच प्रदर्शित झालेल्या भागात स्पर्धकांना एक नॉमिनेशन टास्क देण्यात आलेला असतो, ज्यामध्ये दोन जणांना वेगवेगळ्या ठिकाणी बसवलं जातं आणि त्यांना १९ मिनिटांचा हिशोब ठेवायचा असतो; पण त्या दरम्यान घरातील इतर स्पर्धक त्यांचं लक्ष विचलीत कसं होईल यासाठी प्रयत्न करणार असतात. यादरम्यान अशनूर आणि अभिषेक बजाजला तिथे बसवलं जातं.
हिना खान फरहाना भट्टवर का भडकली?
‘बिग बॉस १९’च्या घरातील स्पर्धक फरहाना भट्ट त्यावेळी अशनूरचं लक्ष विचलीत करण्यासाठी आलेली असताना जे बोलते ते ऐकून हिना खानला राग अनावर झाला आणि तिने सोशल मीडियावर यासंबंधित प्रतिक्रिया दिली. या टास्कदरम्यान फरहाना भट्ट म्हणते, “तुझ्याकडे मालिकांमध्ये काम करण्याचा अनुभव आहे, पण त्यात मला तरी काही रस नाहीये. तुला माहीतच असेल मी चित्रपटांमध्ये काम करते. तू फक्त २१ वर्षांची आहेस, त्यामुळे तुला अजून खूप काही शिकायचं आहे. मला असं वाटतं की तू या शोमध्ये खूप लवकर आलीस.” फरहानाच्या या वक्तव्यामुळे हिना खान भडकली.
हिना खानची प्रतिक्रिया
हिना खान एक्सवर याबद्दल प्रतिक्रिया देत म्हणाली, “भारतीय टेलिव्हिजनवरील सगळ्यात मोठा शो आयएनओएक्सवर प्रदर्शित होतो का? माझ्या मते तरी टेलिव्हिजनवर होतो. नाही का? असो, आमच्या टेलिव्हिजनचं मन इतकं मोठं आहे की, इथे कोणीही स्टार होऊ शकतो.” शेवटी तिने “मला बोलायला भाग पाडू नको” असं लिहिलं आहे.
हिना खान पुढे म्हणाली, “आपण कुठल्याही माध्यमात चांगल्या आणि उल्लेखनीय कामाला प्राधान्य देतो आणि सर्व माध्यमांचा समान आदर करतो, जे कोणत्याही माध्यामातील कोणताही नामांकित आणि अनुभवी कलाकार करणार नाही. रिकाम्या भांड्यांमधून फक्त आवाज येत असतो, फक्त आवाज. पण, टेलिव्हिजनचा अपमान करण्याची हिंमत करू नकोस एवढंच.”
हिना खानने नंतर ही पोस्ट डिलीट केली, पण सध्या तिने एक्सवर केलेल्या या पोस्टची चर्चा सुरू आहे. हिना खान स्वत: ‘बिग बॉस’मध्ये सहभागी झाली होती. तिने ‘बिग बॉस’ सीझन ११मध्ये सहभाग घेतला होता.