LagnaNantar Hoilach Prem Promo : ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ ही मालिका आता एका नव्या वळणावर येऊन पोहोचली आहे. काही दिवसांपूर्वी काव्यावरील प्रेमापोटी नंदिनीला हडतूड करणारा जीवा आता तिची सगळ्या कुटुंबीयांसमोर ठामपणे बाजू घेत असल्याचं पाहायला मिळत आहे. अशातच काव्या आणि जीवा कॅफेमध्ये एकमेकांसमोर येतात. यावेळी काव्या जीवाच्या करिअरबद्दल वक्तव्य करते. यानंतर जीवा तिला खडेबोल सुनावतो.

आता माझ्याबरोबर नंदिनी आहे, ती मला कायम साथ देतेय. तिच्या या स्वभावामुळे मी नक्कीच यशस्वी होईन आणि भविष्यात जरी कधी मला अपयश आलं तरीही नंदिनी मला कधीच सोडून जाणार नाही असा विश्वास ठामपणे जीवा काव्यासमोर व्यक्त करतो. असा सपोर्ट मला आधीपासून मिळाला असता तर मी यापूर्वीच सेटल झालो असतो, असंही तो काव्याला सांगतो. यामुळे काव्या-जीवाचं नातं आता कायमस्वरुपी संपलंय यावर शिक्कामोर्तब झालेलं आहे.

दुसरीकडे, नंदिनी आणि जीवामध्ये खूप चांगली मैत्री झालेली असते. नंदिनी क्षणोक्षणी नवऱ्याची पाठराखण करताना दिसते. अशातच आता जीवाच्या सगळ्या प्रयत्नांना यश मिळून त्याला पहिलं डील मिळालं आहे. जीवा याच आनंदाच्या भरात घरी येतो आणि नंदिनीला मिठी मारतो. तो म्हणतो, “नंदिनी आता मला आयुष्यात खूप पुढे जायचंय.”

नंदिनी सुद्धा नवऱ्याला खूश पाहून प्रचंड आनंदी होते आणि म्हणते, “तुम्ही जिथे जाल… तिथे तुमची ही बायको कायम तुमच्या पाठिशी उभी असेल” यावर जीवा लगेच म्हणतो, “मागे नको तू माझ्या ‘सोबत’ हवीयेस” यानंतर दोघांनाही त्यांचा घटस्फोट होणार असल्याचं आठवतं, त्यांचा चेहरा पडतो आणि आपण एकमेकांच्या मिठीत असल्याची जाणीव होते. नंदिनी लगेच जीवापासून दूर होते.

आता जीवा-नंदिनी भविष्यासाठी काय निर्णय घेणार? दोघेही एकत्र येणार की त्याआधीच वसु आत्याला काव्या-जीवाच्या पूर्वाश्रमीच्या नात्याचं गुपित कळणार? असे प्रश्न आता प्रेक्षकांच्या मनात निर्माण झाले आहेत. ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ मालिकेचा हा विशेष भाग या आठवड्यात संध्याकाळी ७ वाजता प्रसारित करण्यात येणार आहे.