Lagnanantar Hoilach Prem Promo : ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ या मालिकेत वसु आत्या आणि रम्या या दोघींनी मिळून नंदिनीविरोधात मोठा कट रचल्याचं पाहायला मिळालं. नंदिनी वसु आत्यांचा खरा चेहरा देशमुख कुटुंबीयांसमोर उघड करण्यासाठी दीपकची जामिनावर सुटका करून आणते. पण, घरी आल्यावर दीपक ऐनवेळेला पलटी मारतो आणि वसु आत्यांची बाजू घेतो.
दीपक अशाप्रकारे सगळ्यांसमोर आपल्याला खोटं पाडतोय हे पाहून नंदिनीचा राग अनावर होतो आणि ती दीपकला सणसणीत कानाखाली मारते. यावेळी काव्या, जीवा आणि पार्थ हे तिघेही नंदिनीच्या बाजूने ठामपणे उभे राहतात. अगदी तिची सासू मानिनी सुद्धा नंदिनीची बाजू घेते. मात्र, विक्रम देशमुख वसु आत्यांना पाठिंबा देत नंदिनीचा अपमान करतात. यापुढे मला ‘बाबा’ म्हणून मला हाक मारू नकोस असंही बजावतात. यामुळे नंदिनीला अश्रू अनावर होतात. काव्याला सुद्धा या सगळ्या गोष्टींचा भयंकर त्रास होतो.
आता आपण जिंकलोय हा विचार करून रम्या आणि वसु आत्यांच्या चेहऱ्यावर कपटी हसु दिसू लागतं. पण, आता नंदिनी शांत बसणार नसते. ती वसु आत्याला समोरासमोर ताकीद देणार आहे आणि काहीही झालं तरी मी तुमचा खोटेपणा उघड करेन असं आत्मविश्वासाने ती त्यांना सांगणार आहे. आता वसु आत्याच्या पापाचा घडा लवकरच भरणार आहे. कारण, तिने केलेलं सर्वात मोठं कारस्थान लवकरच मालिकेत उघड होईल. याचा प्रोमो नुकताच ‘स्टार प्रवाह’ वाहिनीने शेअर केला आहे.
काव्या यात म्हणते, “आता येणारी वेळच सांगेल आणि आम्ही सगळे मिळून तुमचा खरा चेहरा उघड करू” यानंतर काव्या पूजेच्या दिव्यावर हात धरून शपथ घेते आणि लगेच पार्थ, जीवा आणि नंदिनी देखील तिला साथ देतात. इतक्यात मिथुन काका एक मोठा पुरावा घेऊन समोर येतात.
मिथुन काकांच्या मोबाईलमध्ये वसु आत्याने नेमकं कसं नंदिनीला किडनॅप केलं होतं. याचा कबुली जबाब देण्यात आलेला असतो. हा व्हिडीओ सँडी आणि त्याच्या बहिणीमध्ये झालेल्या संवादाचा आहे असा प्राथमिक अंदाज प्रोमो पाहून येत आहे. मात्र, हा व्हिडीओ समोर येताच वसु आत्याच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे बारा वाजल्याचं पाहायला मिळतंय.
वसु आत्याचा खरा चेहरा उघड झाल्यावर काव्या कसलाही विचार न करता सर्वात आधी तिचा गळा धरते आणि तुम्ही केलेल्या या सर्वात मोठ्या कारस्थानामुळे आमच्यावर मनाविरुद्ध लग्न करण्याची वेळ आली असा आरोप वसु आत्यावर करते. काव्या रागात म्हणते, “आमची आयुष्यं उद्धवस्थ केलीत आता तुम्हाला मी सोडणार नाहीये आत्याबाई” यावेळी रागाच्याभरात ती वसुंधराचा गळा धरते. यावेळी सगळ्यात आधी रम्या आपल्या आईची सुटका करून घेण्यासाठी पुढे येते असं प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे.
दरम्यान, आता वसु आत्याचं सत्य उघड झाल्यावर विक्रम देशमुख यावर काय निर्णय घेणार, वसु आत्याला आणखी कोणती शिक्षा होणार हे मालिकेच्या आगामी भागात पाहायला मिळेल. प्रेक्षक हा प्रोमो खूपच आनंदी झाले आहेत, प्रोमोच्या कमेंट्समध्ये मालिकेच्या चाहत्यांनी आनंद व्यक्त केला आहे. ही मालिका ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर रोज सायंकाळी ७ वाजता प्रसारित केली जाते.