‘लाखात एक आमचा दादा’ (Lakhat Ek Aamcha Dada) ही मालिका काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. मात्र, वेगळ्या कथानकामुळे या मालिकेने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करण्यास सुरुवात केली आहे. आता झी मराठी वाहिनीने ‘लाखात एक आमचा दादा’ या मालिकेत पुढच्या भागात काय होणार आहे, याचा प्रोमो सोशल मीडियावर शेअर केला आहे. मात्र, यामध्ये दाखवलेल्या कथानक आणि दृश्यामुळे नेटकरी यावर व्यक्त होताना दिसत आहे.
‘झी मराठी’ वाहिनीने इन्स्टाग्रामच्या अधिकृत अकाउंटवर ‘लाखात एक आमचा दादा’ या मालिकेचा प्रोमो शेअर केला आहे. यामध्ये सूर्याची सगळ्यात लहान बहीण भाग्यश्री हिला पहिल्यांदाच मासिक पाळी आल्याचे पाहायला मिळत आहे.
व्हिडीओमध्ये दाखविल्याप्रमाणे, सूर्या काहीतरी काम करत आहे आणि तिथूनच तो आपल्या सर्वात धाकट्या बहिणीला भाग्यश्रीला म्हणतो, “तू पण जायचंस की खरेदी करायला”, त्यावर भांडी घासत असलेली भाग्यश्री म्हणते, “माझ्या पोटात दुखतंय”, सूर्या तिला म्हणतो, “कशाला भांडी घासतेस, आराम कर”, भाग्यश्री त्याला म्हणते, “एवढी भांडी घासून झाली की आरामच करणार आहे.” जेव्हा ती उठते तेव्हा तिच्या कपड्यांना रक्त लागलेलं दिसतं. ती घाबरून दादा अशी सूर्याला हाक मारते. त्याला म्हणते, “मला खूप कसंतरी होतंय.”
सूर्या तिला विचारतो, “काय होतंय?” तर ती म्हणते खूप पोटात दुखतंय, मला हे असं का होतंय? सूर्या तिला म्हणतो काळजी करू नको, मी डॉक्टरांना बोलावून आणतो, असे म्हणत तो जात असतो, तोपर्यंत त्याच्या काहीतरी लक्षात येते आणि तो थांबतो. आता झी मराठी वाहिनीने हा प्रोमो शेअर करताना मासिक पाळीच्या दिवसात दादा आपल्या बहिणीची मदत करू शकेल का? असे म्हटले आहे. आता हा प्रोमो पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर प्रतिक्रिया दिल्या आहेत.
‘लाखात एक आमचा दादा’ मालिकेतील हे सीन पाहिल्यावर काय म्हणाले नेटकरी?
‘लाखात एक आमचा दादा’ मालिकेतील हा सीन पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर प्रतिक्रिया देताना कौतुक केले आहे. एका नेटकऱ्याने म्हटले, “खूपच मस्त विषय आहे, कारण असे कोणत्याच मालिकेत दाखवले जात नाही.” तर दुसऱ्या नेटकऱ्याने म्हटले, “अशा मालिका, असे विषय दाखवा”, आणखी एका नेटकऱ्याने कौतुक करत लिहिले, “प्रत्येक मालिकेत सासू-सुना यांच्यामधील भांडणे, प्रेम प्रकरणं आणि कट कारस्थानं दाखवतात. हेच बघून खऱ्या आयुष्यात लोकपण तसेच वागतात. त्यामुळे या मालिकेत जो विषय दाखवलाय तसा विषय दाखवा”, असे लिहिले आहे. अनेकांनी मालिकेत हा विषय दाखविल्याबद्दल कौतुक केले आहे.
आता सूर्या दादा आपल्या बहिणीची मदत करू शकणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
© IE Online Media Services (P) Ltd