Lakhat Ek Aamcha Dada: ‘लाखात एक आमचा दादा’ या मालिकेत काही दिवसांपासून सतत ट्विस्ट येताना दिसत आहे. मालिकेत डॅडींना आशाचा पत्ता मिळतो. ते तिला एका निर्जन स्थळी असलेल्या एका घरात बांधून ठेवतात. तिचा छळ करतात. मात्र, तुळजा आशाला सोडवते आणि तिला दवाखान्यात भरती करते.
‘लाखात एक आमचा दादा’ मालिकेत पुढे काय होणार?
आता या मालिकेचा एक प्रोमो समोर आला आहे. या प्रोमोमध्ये तुळजाला ज्या महिलेला तिने वाचवले, ती सूर्याची आई असल्याचे समजते. झी मराठी वाहिनीने शेअर केलेल्या प्रोमोमध्ये पाहायला मिळते की, राजश्री व सूर्या बॉक्सजवळ घराबाहेर उभे आहेत. तितक्यात सूर्याचा मित्र येतो आणि त्याला सांगतो की, दादा गावातील एकही टेम्पो यायला तयार नाही. त्यामुळे सूर्या व राजश्री काळजीत पडतात.
प्रोमोमध्ये पुढे पाहायला मिळते की, तुळजा पोलिस ठाण्यात गेली आहे. ती तेथील पोलीस महिला कर्मचाऱ्याला विचारते की, आम्ही मागच्या वेळी तुरुंगात एक कॅम्प घेतला होता. त्या वेळच्या महिला कैदी तुरुंगात असतील ना? त्यावर ती पोलीस सांगते की, एक महिला बाहेर गेली आहे. तुळजा त्या महिलेची कागदपत्रे पाहते. तर त्यावरील नाव व फोटो पाहून तिला धक्का बसतो. ती आशा शंकर जगताप, हे नाव ती मोठ्या आश्चर्याने वाचते. ती स्वत:शीच म्हणते की, या तर सूर्याची आई आहेत.
दुसरीकडे सूर्या राजश्रीच्या मालाची डिलिव्हरी करण्यासाठी जुगाड करतो. तो त्याच्या गाडीवरून बॉक्स घेऊन जात असल्याचे दिसत आहे. संध्याकाळी सूर्या व तुळजा एकत्र बसलेले प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे. तो आनंदाने तुळजाला सांगतो की, एकदाची ऑर्डर पूर्ण झाली. त्यावर तुळजा त्याला म्हणते, “तुझी आई जर इथे असती तर…”, त्यावर सूर्याला राग येतो. तो तुळजाला म्हणतो, “तिचं नाव काढलं ना की, सगळं सुख-दु:ख मातीमोल ठरतं. त्या बाईचं माझ्यासमोर नाव काढायचं नाही म्हणजे नाही”, अशी ताकीद सूर्या तुळजाला देताना दिसत आहे.
हा प्रोमो शेअर करताना झी मराठी वाहिनीने सोशल मीडियावर ‘आईचं सत्य तुळजा सूर्याला सांगू शकेल का?’, अशी कॅप्शन दिली आहे.
लाखात एक आमचा दादा मालिकेत दाखविल्याप्रमाणे, सूर्याची आई तो आणि त्याच्या बहिणी लहान असतानाच घरातून निघून गेली. त्यानंतर ती पळून गेली आहे, अशी गावात चर्चा झाली. त्यामुळे सूर्याच्या वडिलांना दारूचे व्यसन लागले. परिणामी, घरासह बहिणींची जबाबदारी सूर्यावर आली. त्याने बहिणींना मोठ्या प्रेमाने वाढवले. त्यांच्यावर चांगले संस्कार केले. त्या सुखात राहाव्यात यासाठी त्याने सातत्याने प्रयत्न केले. त्याने वडिलांचादेखील प्रेमाने सांभाळ केला. मात्र, सूर्याच्या मनात ही गोष्ट कायम राहिली की, आईने तिच्या मुलांचा विचार केला नाही.
या सगळ्यात सूर्याला ही गोष्ट माहीतच नाही की, त्याची आई वर्षानुवर्षे तुरुंगात होती. तो ज्या डॅडींना जालिंदरला देव मानतो, त्यांच्यामुळेच त्याची आई तुरुंगात गेली होती. मात्र, त्याला या सत्यापासून डॅडींनी कायम दूर ठेवले.
आता तुळजा हे सत्य सूर्याला सांगणार का, डॅडींचे सत्य सर्वांसमोर कधी येणार, सूर्याची व त्याच्या आईची भेट कधी होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.