Lakshmi Niwas Fame Meghan Jadhav Wedding : मराठी कलाविश्वातील लोकप्रिय जोडी म्हणजेच अभिनेता मेघन जाधव व अभिनेत्री अनुष्का पिंपुटकर यांचा विवाहसोहळा नुकताच थाटामाटात पार पडला. ‘रंग माझा वेगळा’ या मालिकेच्या शूटिंगदरम्यान या दोघांच्या लव्हस्टोरीची सुरुवात झाली होती. सेटवर दोघांची ओळख झाली, पुढे छान मैत्री झाली आणि आता दोघंही आयुष्यभराचे जोडीदार झाले आहेत. मेघन-अनुष्काच्या लग्नसोहळ्याला मराठी कलाकारांची मांदियाळी पाहायला मिळाली. त्यांना शुभेच्छा देण्यासाठी कोण-कोण लग्नाला गेलं होतं पाहुयात…

मेघन व अनुष्काच्या लग्नाला सर्वप्रथम ‘रंग माझा वेगळा’ मालिकेची टीम पोहोचली होती. रेश्मा शिंदे, तनिष्का विशे, आशुतोष गोखले आणि हर्षदा खानविलकर हे तिघंही लग्नाला एकत्र पोहोचले होते. हर्षदा खानविलकरांनी मेघनचं औक्षण सुद्धा केलं. त्या म्हणतात, “हा माझा जावई आहे…आमच्या शोमध्ये ( रंग माझा वेगळा ) हा आमचा जावई होता. ‘रंग माझा वेगळा’मध्ये हे दोघं भेटले, मैत्री झाली आणि तेव्हा खरंच वाटलं नव्हतं की असं काही असेल. शो संपताना आमच्या लक्षात आलं की ओह…असं काहीतरी आहे. आज मला या दोघांसाठी खूप-खूप छान वाटतंय.”

मेघन जाधव हा अभिनेता मंदार जाधवचा सख्खा भाऊ आहे. त्यामुळे मंदारने प्रमुख भूमिका साकारलेल्या ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेच्या टीमने सुद्धा मेघन-अनुष्काच्या लग्नाला उपस्थिती लावली होती. गिरीजा प्रभू, माधवी निमकर, मृण्मयी गोंधळेकर, संजय पाटील, भक्ती रत्नपारखी, अपर्णा गोखले हे सगळे कलाकार या सोहळ्याला उपस्थित होते. याशिवाय अभिनेत्री सुकन्या मोने सुद्धा मेघन-अनुष्काला शुभेच्छा देण्यासाठी आल्या होत्या.

मेघन सध्या ‘लक्ष्मी निवास’ मालिकेत जयंत ही भूमिका साकारत आहे. जयंतचं पात्र कायम सर्वत्र चर्चेत असतं. ‘लक्ष्मी निवास’ची संपूर्ण टीम मेघनला नव्या आयुष्याच्या शुभेच्छा देण्यासाठी पोहोचली होती. जान्हवी, हरीश, सिंचना, मंगल, आरती वहिनी, वेंकी दादा, आजी, अधिराज, भावना, श्रीनिवास, वीणा असे सगळे कलाकार मेघन-अनुष्काच्या लग्नाला उपस्थित होते.

दरम्यान, मेघन-अनुष्काने लग्न लागताना पारंपरिक लूक केला होता. अनुष्काने खास गुलाबी रंगाची नऊवारी साडी नेसली होती. तर, रिसेप्शनला या दोघांनी ट्विनिंग केल्याचं पाहायला मिळालं.