Lakshmi Niwas : ‘लक्ष्मी निवास’ मालिकेत अखेर जयंतचा भूतकाळ जान्हवीसमोर आलेला आहे. जयंतला बालपणापासूनच मोठ्या अडचणींचा सामना करावा लागलेला असतो. आजोबांचं प्रमाणाबाहेर त्रास देणं, जरा चूक झाली की शिक्षा सुनावणं, आईची आत्महत्या, आश्रमात गेलेलं बालपण या सगळ्या गोष्टींचा जयंतच्या आयुष्यावर खोलवर परिणाम झालेला असतो.
जयंत एकटा राहू लागतो, मनाविरुद्ध गोष्टी घडल्यास चुकीचं पाऊल उचलतो, कोणत्याही थराला जाणून माणसांना हानी पोहोचवणं, पझेसिव्ह वागणं हाच त्याचा मूळ स्वभाव आहे हे जान्हवीला आता कळून चुकलेलं आहे. जयंतच्या भूतकाळाविषयी माहिती जाणून घेण्यासाठी जान्हवी त्याच्या आश्रमात गेलेली असते. सगळं सत्य जाणून घेतल्यावर जान्हवीला मोठा धक्का बसतो, ती प्रचंड खचते. तरी अजून, वेंकी आणि जयंत यांचा भूतकाळातील संबंध अद्याप जान्हवीच्या लक्षात आलेला नाहीये.
आता जयंत आणि जान्हवीच्या नात्याची खरी अग्निपरीक्षा सुरू होणार आहे. कारण, नवऱ्याच्या भूतकाळातील माहिती जाणून घेण्यासाठी जान्हवी घराबाहेर पडलेली असते, त्यामुळे जयंतचा जानू आपल्याला सोडून गेली की काय असा समज होतो.
बायको सोडून गेलीये या विचाराने जयंत अस्वस्थ होतो, तो लगेच जान्हवीच्या फोटोची स्टँडी बनवून घेतो, जेणेकरून जान्हवी सतत त्याच्या डोळ्यासमोर राहील. यावरून जयंत मानसिक रुग्ण असल्याचं देखील स्पष्ट झालेलं आहे.
नवऱ्याचा भयंकर भूतकाळ आणि विचित्र वागणं पाहिल्यावर जान्हवीला अश्रू अनावर होतात. देवीआईच्या मंदिरात जाऊन ती नशिबाला दोष देऊ लागते. तर, दुसरीकडे जयंत जान्हवीच्या फोटोची स्टँडी घेऊन आत्महत्या करण्यासाठी डोंगरावर जातो. आता काही करून आपल्या जीवाला संपवायचं, जानूशिवाय जगणं अशक्य आहे त्यामुळे आत्महत्या करणं हा एकच मार्ग उरलाय असा विचार जयंत करतो.
आता जयंतचा जीव जाणार? की ऐनवेळी त्याला कोणीतरी वाचवणार? हे मालिकेचा आगामी भागात प्रेक्षकांना पाहायला मिळेल. ‘लक्ष्मी निवास’ मालिकेचा हा विशेष भाग २१ आणि २२ जुलैला रात्री ८ वाजता प्रसारित केला जाणार आहे. ही मालिका रोज एक तास म्हणजेच रात्री ८ ते ९ यावेळेत प्रसारित केली जाते.