‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमामुळे अभिनेत्री वनिता खरात घराघरांत लोकप्रिय झाली. तिने गेल्यावर्षी २ फेब्रुवारी २०२३ रोजी सुमित लोंढेबरोबर लग्नगाठ बांधली. या दोघांची जोडी सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत असते. होळीच्या सणानिमित्त वनिताचा पती सुमितने शेअर केलेला एक व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. यामध्ये वनिता होळीचं पूजन करून नवऱ्याचं उखाण्यातून नाव घेत असल्याचं पाहायला मिळत आहे.

देशभरात गेले दोन दिवस मोठ्या उत्साहाने होळी हा सण साजरा करण्यात आला. महाराष्ट्रात परंपरेनुसार होळीची पूजा करून नैवेद्य दाखवला जातो. तसेच नवीन लग्न झालेल्या बायका यावेळी उखाणे घेतात. वनिताने सुद्धा सणानिमित्त खास उखाणा घेतला आहे.

हेही वाचा : कोकणी संस्कृती, गवळण अन्…; ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेत्याने भांडुपच्या चाळीत साजरी केली होळी, व्हिडीओ व्हायरल

वनिता म्हणते, “होळीवर माळ चढवली होती हिरव्या गुलाबी गोंड्यांची, सुमित रावांचं नाव घेते सून मी लोंढ्यांची!” तिचा हा उखाणा ऐकल्यावर उपस्थित सगळेजण टाळ्या वाजवून वनिताचं कौतुक करत असल्याचं या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे.

हेही वाचा : “त्यावेळी जातीचे रंग…”, कुशल बद्रिकेने सांगितली चाळीतल्या होळीची आठवण; म्हणाला, “फ्लॅट संस्कृतीत…”

होळीनिमित्त शूटिंगमधून वेळात वेळ काढून वनिता खास तयार झाली होती. फिकट निळ्या रंगाची साडी, नाकात नथ असा लूक तिने केला होता. सध्या तिचे चाहते या व्हिडीओवर कौतुकाचा वर्षाव करत आहेत. “किती गोड उखाणा”, “सुमित तुझी बायको भारी आहे”, “वणीची पहिली होळी” अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर केल्या आहेत.