मराठी मालिका, चित्रपट आणि नाटक अशा तिन्ही माध्यमातून घराघरांत लोकप्रिय झालेली अभिनेत्री म्हणजेच ऋतुजा बागवे. काही दिवसांपूर्वीच ऋतुजाने व्यवसाय क्षेत्रात पदार्पण केलं. अभिनेत्रीने मरोळ येथे तिचं नवीन रेस्टॉरंट सुरू केलं आहे; ज्याचं नाव आहे ‘फूडचं पाऊल’.

ऋतुजाच्या नवीन रेस्टॉरंटच्या उद्घाटन सोहळ्याला लोकप्रिय अभिनेता सुबोध भावे व त्याची पत्नी देखील उपस्थित होती. याशिवाय आतापर्यंत बऱ्याच मराठी कलाकारांनी ऋतुजाच्या रेस्टॉरंटला भेट दिली आहे. आता नुकताच ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम लोकप्रिय अभिनेता रोहित माने ‘फूडचं पाऊल’मध्ये जेवायला गेला होता. यादरम्यान, त्याने मटण थाळीवर ताव मारला. रोहित ‘फूडचं पाऊल’मधील जेवणाविषयी नेमकं काय म्हणाला जाणून घेऊयात…

रोहित माने जेवणाचं ताट दाखवत सांगतो, “यावरून अंदाज आला असेल मला जेवण किती आवडलंय ते…मी अगदी चाटून-पुसून सर्व खाल्लेलं आहे. एक नंबर मटणं होतं. मटण म्हणजे मटण असतं…खरंच भारी! हे माझ्या मित्रमंडळींचं हॉटेल आहे. मी खरंतर फार लेट आलो जेवायला. पण, हे जेवण जेवून माझं मन भरलं. मी तुम्हाला सांगेन या ‘फूडचं पाऊल’ रेस्टॉरंटला नक्की भेट द्या. एक नंबर जेवण आहे, स्पेशली मटण…मला वाटतं मुंबईत फार कमी ठिकाणी असं तांबडा-पांढरा रस्सा, अळणी भात वगैरे मिळतं…असं सगळीकडे मिळत नाही. त्यामुळे तुम्ही सुद्धा हे सगळं टेस्ट करायला नक्की या!”

ऋतुजाने रोहितचा हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. अभिनेत्री म्हणते, “रोहित माने उर्फ सावत्या फूडचं पाऊलमध्ये आलाय… रोहित इथे जेवल्यावर तुझ्या चेहऱ्यावरचा जो काही आनंद होता तो खूप काही सांगून गेला. थँक्यू तू आलास…आमच्या जेवणाचं कौतुक केलंस आणि आमच्या स्वप्नांना बळ दिलंस.”

दरम्यान, ऋतुजाच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं, आजवर तिने नाटक, चित्रपट, मालिका अशा तिन्ही क्षेत्रांमध्ये काम केलं आहे. काही महिन्यांपूर्वीच तिने ‘माटी से बंधी डोर’ या हिंदी मालिकेत मुख्य भूमिका साकारली होती. याशिवाय नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘अंधारमाया’ सीरिजमध्ये तिने महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्याचं पाहायला मिळालं आहे. मात्र, काही वर्षांपूर्वीच्या ‘नांदा सौख्यभरे’ या मालिकेमुळे ऋतुजाला घराघरांत लोकप्रियता मिळाली होती.