गेल्या काही दिवसांपासून अनेक कलाकार उद्योग क्षेत्रात पाऊल ठेवत आहेत. अभिनय क्षेत्रातलं काम सांभाळत स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहेत. अभिनेत्री मेघा धाडे, श्रेया बुगडे, अनघा अतुल, अरबाज शेख, तेजस्विनी पंडित अशा अनेक कलाकारांनी स्वतःचा व्यवसाय सुरू केला आहे. याशिवाय कलाकारांची मुलं देखील वेगवेगळ्या व्यवसाय क्षेत्रात पदार्पण करत आहेत. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेते अरुण कदम यांच्या मुलीने (सुकन्या कदम-पोवाळे) आणि जावयाने (सागर पोवाळे) हॉटेल व्यवसायात पाऊल ठेवलं आहे.
अभिनेते अरुण कदम यांनी स्वतः ही आनंदाची बातमी चाहत्यांबरोबर शेअर केली आहे. अरुण कदम यांची लेक आणि जावयाने ठाण्यात स्वतःचं मोठं रेस्टॉरंट सुरू केलं आहे. यानिमित्ताने आपल्या लेकीला शुभेच्छा देण्यासाठी काही दिवसांपूर्वी अरुण कदम यांनी पत्नीसह लेकींच्या रेस्टॉरंटला भेट दिली. या भेटीचा व्हिडीओ त्यांनी इन्स्टाग्रामला शेअर केला आहे.
हा व्हिडीओ शेअर करत अरुण कदम यांनी लिहिलं आहे, “माझे जावई आणि सुकन्या यांचं कासारवडवली, ठाणे (वेस्ट) येथे ‘२७ पाम्स रेस्टॉरंट’ सुरू झाल्याबद्दल खूप खूप शुभेच्छा.” या व्हिडीओमध्ये, अरुण कदम यांच्यासह त्यांची पत्नी, मुलगी, जावई, नातू पाहायला मिळत आहेत.
अरुण कदम यांच्या या पोस्टवर चाहत्यांनी त्यांच्या मुलीला आणि जावयाला भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत. दरम्यान, अरुण कदम यांची मुलगी सुकन्या कदमने २०२१मध्ये सागर पोवाळेशी लग्नगाठ बांधली. लग्नाच्या वर्षभरानंतर सुकन्याने १९ ऑगस्ट रोजी एका गोंडस बाळाला जन्म दिला.
हेही वाचा – ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ फेम अभिनेता झाला बाबा, आनंदाची बातमी देत म्हणाला, “आमच्या लाडक्या…”
सुकन्या ही कमर्शिअल आर्टिस्ट, ग्राफिक डिझायनर आहे. शिवाय तिने भरतनाट्यमचे धडे देखील गिरवले आहेत. लॉकडाउनच्या काळात तिने वडिलांसोबत अनेक टिकटॉक व्हिडीओ केले होते आणि ते व्हिडीओ चाहत्यांना प्रचंड आवडले होते. सध्या सुकन्या ही एका कंपनीमध्ये ग्राफिक डिझायनरचे काम करते. तिचा पती सागर ब्रीविंग कन्सल्टंट म्हणून काम करत आहे.
© IE Online Media Services (P) Ltd