‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या लोकप्रिय कार्यक्रमातून प्रसिद्धी झोतात आलेल्या शिवाली परबने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. ‘महाराष्ट्राची क्रश’, ‘कल्याणची चुलबुली’ म्हणून ओळखली जाणारी शिवाली परब आता विविधांगी भूमिकेत पाहायला मिळत आहे. अलीकडेच १७ जानेवारीला तिचा ‘मंगला’ नावाचा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात शिवाली प्रमुख भूमिकेत झळकली होती. ‘मंगला’ चित्रपटातील तिच्या कामाचं कौतुक बऱ्याच दिग्गज कलाकारांनी केलं. नुकताच शिवालीने एक डान्स व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे; जो खूप चर्चेत आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अभिनेत्री शिवाली परब सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. नेहमी हास्यजत्रेतील कलाकारांबरोबरचे फोटो, व्हिडीओ शेअर करत असते. नुकत्याच शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये शिवाली रवीना टंडनची १९ वर्षांची मुलगी राशा थडानीच्या ‘उई अम्मा’ गाण्यावर जबरदस्त डान्स करताना पाहायला मिळत आहे. तिला हा डान्स चेतना भटने शिकवला आहे.

हा डान्स व्हिडीओ शेअर करत शिवालीने कॅप्शन लिहिलं आहे की, उई अम्मा…चेतना भटने मला डान्स शिकवल्याबद्दल विशेष आभार, आय लव्ह यू. शिवालीचा ‘उई अम्मा’ गाण्यावरचा डान्स पाहून नेटकरी तिचं कौतुक करत आहेत. ‘एक नंबर’, ‘भारी’, ‘ओरिजन डान्स पेक्षा भारी आहे’, अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांच्या उमटल्या आहेत.

दरम्यान, राशा थडानीचं ‘उई उम्मा’ गाणं ४ जानेवारीला प्रदर्शित झालं होतं. मधुबंती बागने हे गाणं गायलं असून अमित त्रिवेदीने संगीतबद्ध केलं आहे. तर अमिताभ भट्टाचार्य गीतकार आहेत. या गाण्यातील जबरदस्त डान्समुळे राशा चांगलीच भाव खाऊन गेली. तसंच या गाण्यामुळे राशा खूप चर्चेत आली, तिच्या डान्सचं आणि एक्सप्रेशनचं खूप कौतुक झालं.

शिवाली परबच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमाबरोबरच दुसऱ्या बाजूला तिचं जोरदार नाटक सुरू आहे. प्रसाद खांडेकर दिग्दर्शित ‘थेट तुमच्या घरातून’ या नाटकात शिवाली पाहायला मिळत आहे. या नाटकात तिने श्रुती कदमची भूमिका साकारली आहे. तसंच ‘थेट तुमच्या घरातून’ या नाटकाच्या माध्यमातून शिवालीने नाट्य क्षेत्रात पदार्पण केलं आहे. या नाटकात शिवालीसह प्रसाद खांडेकर, ओंकार राऊत, भक्ती देसाई, प्रथमेश शिवलकर आणि नम्रता संभेराव पाहायला मिळत आहेत.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtrachi hasyajatra fame shivali parab dance on uyi amma song pps