वसईमध्ये भरदिवसा रस्त्यात एका तरुणीची प्रियकराने हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार मंगळवारी घडला. या घटनेचा व्हिडीओ सर्वत्र व्हायरल होत असून सर्व स्तरांतून या आरोपीवर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी केली जात आहे. वसईत या संबंधित प्रियकराने आपल्या प्रेयसीवर लोखंडी पान्याने वार करत तिची हत्या केली आहे. या घटनेवर आता अभिनेते आणि शिवसेनेचे (ठाकरे गट) पदाधिकारी किरण माने यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत आपलं मत व्यक्त केलं आहे. 'बिग बॉस मराठी' या कार्यक्रमातून किरण माने घराघरांत पोहोचले. सोशल मीडियावर सामाजिक व राजकीय परिस्थितीबाबत ते नेहमीच पोस्ट शेअर करत असतात. नुकत्याच शेअर केलेल्या पोस्टमध्ये किरण माने यांनी राज्यात रोज एवढे भयानक अपराध होत असल्याने गृहमंत्री महोदय आता खुर्ची सोडा असं म्हटलं आहे. अभिनेत्याने पोस्टमध्ये नेमकं काय लिहिलंय सविस्तर जाणून घेऊयात… हेही वाचा : Video : “जर तू मेलीस तर मी…”; लेकीच्या ‘त्या’ प्रतिक्रियेने क्रांती रेडकरला बसला आश्चर्याचा धक्का, म्हणाली, “तीन फुटांची पण नाहीये…” किरण माने यांची पोस्ट वसईमधील तरुणीच्या हत्येचा व्हिडीओ पाहून काळीज पिळवटलं. या तरुणीने याआधी या तरुणाबद्दल पोलिसांमध्ये तक्रार दिलेली होती! गृहमंत्री महोदय, आतातरी राजीनामा द्या. तुम्ही विरोधी पक्षनेते होता तेव्हा भर करोनाकाळाच सुशांतसिंग राजपूतसाठी घसा खरवडून कोकलत होतात. आता त्याहून भयानक अपराध रोज घडताहेत. सोडा खुर्ची…लायक माणसाला बसवा तिथे. असं किरण मानेंनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. हेही वाचा : सुषमा अंधारेंचं वक्तव्य; “दिवसाढवळ्या वसईत तरुणीची हत्या होते आणि लोक बघत राहतात, हे…” वसईमध्ये नेमकं काय घडलं? नालासोपारा येथे राहणाऱ्या २९ वर्षीय रोहित यादवचे आणि २२ वर्षीय आरती यादव यांचे मागील सहा वर्षांपासून प्रेमसंबंध होते. मात्र आरती अन्य मुलांशी बोलत असल्याचा रोहितला संशय होता. यावरून दोघांमध्ये वारंवार वाद होत होते. आरती अलीकडेच वसईच्या कंपनीत कामाला लागली होती. तिचं बारावीपर्यंत शिक्षण पूर्ण होऊन एक महिन्यापूर्वीच आरती कामाला लागली होती. तिला गावराई पाडा येथील बँकेजवळ रोहितने अडवलं आणि दोघांमध्ये वाद झाला. यावेळी रोहितने त्याच्याजवळ असलेल्या लोखंडी पान्याने प्रेयसीवर वार केले. यामुळे आरती खाली कोसळली आणि तिचा मृत्यू झाला. वालीव पोलिसांनी घटनास्थळावरून रोहितला ताब्यात घेतलं आहे. यावेळी परिसरात उपस्थित लोकांपैकी कोणीही तिच्या मदतीसाठी पुढे आलं नाही.