‘तुझं माझं ब्रेकअप’ फेम अभिनेत्री मीरा जोशीने सोशल मीडियावर पोस्ट करून तिला आलेला अनुभव सांगितला. माणुसकी अजूनही जिवंत आहे, असं तिने पोस्टमध्ये म्हटलं आहे. मीराची गाडी माजिवड उड्डाणपुलावर बिघडली. तिथे तिला अनोळखी व्यक्ती व पोलिसांनी कशी मदत केली ते तिने सांगितलं.

माणुसकी अजूनही जिवंत आहे

“काल, ट्रॅफिकमध्ये माझी गाडी माजिवडा उड्डाणपुलावर बिघडली. काय करावं सुचत नव्हतं, त्यामुळे मी थोडा वेळ वाट पाहिली आणि गाडी एका लेनमध्ये बाजूला ढकलली. पण गाडी सुरू झाली नाही. तिथून जाणाऱ्या सर्व गाड्यांमधील लोक माझ्याकडे पाहत पुढे जात होते.

शेवटी हताश झाल्याने मी तिथून जाणाऱ्या एका दुचाकीस्वाराला हाक मारली आणि मदत मागितली. त्याने गाडी थांबवली, त्याने माझ्याबरोबर गाडीत नेमका काय बिघाड झालाय, ते पाहिलं. आम्हाला वाटलं की पेट्रोलची टाकी गळत असेल, ज्यामुळे पेट्रोल वाहून जातंय. त्याने गाडीसाठी पेट्रोल आणण्याची ऑफर दिली जेणेकरून मी ती गॅरेजमध्ये पोहोचवू शकेन.

जसाजसा वेळ गेला, मला वाटलं की तो परत येणार नाही, म्हणून मी काही मेकॅनिकना फोन करण्याचा प्रयत्न केला. एकाने अर्ध्या तासात येतो, असं सांगितलं. त्यामुळे माझ्याकडे वाट पाहण्याशिवाय पर्याय नव्हता. या काळात, अनेक ट्रक ड्रायव्हर आणि कारचालक वृद्ध पुरुष मदत करण्यासाठी थांबले. अनोळखी लोकांनी मदतीचा हात दिला. पण तिथून जाणाऱ्या काही तरुणांनी माझ्या गाडीमुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीबद्दल तक्रार करत शिवीगाळ केली.

पण मुंबई पोलीस आल्यावर तिथलं वातावरण बदललं. गाडीमुळे वाहतूक कोंडी झाल्याबद्दल मी त्यांची माफी मागितली, ते म्हणाले, “ही एक मशीन आहे, ती बिघडू शकते.” त्यांचा समजूतदारपणा आणि सहानुभूतीमुळे परिस्थिती सुधारली. त्यांच्या वेगवान प्रतिसादाबद्दल आणि मदतीबद्दल मी आभारी आहे.

पोलीस मला गाडी पुलावरून ढकलण्यास मदत करत होते, तेव्हाच तो दुचाकीस्वार पेट्रोलचा मोठा कॅन घेऊन परतला! मला वाटलं तो येणार नाही, पण अनपेक्षितपणे तो आला, यामुळे आश्चर्यचकित, आनंदी झाले.

मीरा जोशी पोस्ट

पोलिसांच्या मदतीने, आम्ही समस्या त्वरित सोडवून पूल रिकामा केला. मी त्या दुचाकीस्वाराचे नीट आभार मानण्यासाठी आणि त्याने आणलेल्या पेट्रोलचे पैसे परत करण्यासाठी त्याच्या मागे गेले, मी त्याला त्याच्या मदतीसाठी अतिरिक्त पैसे देऊ केले, परंतु तो हसत हसत निघून गेला.

मुंबई पोलिसांच्या सहानुभूती, समजूतदारपणा आणि जलद प्रतिसादाबद्दल खूप खूप धन्यवाद. तुमचे प्रोफेशनलिझम कौतुकास्पद आहे. आणि दुचाकीवरील तो दयाळू अनोळखी माणूस… तुमच्या निःस्वार्थ कृतीने माझा माणुसकीवर पुन्हा विश्वास बसला. तुम्ही दयाळूपणा आणि उदारतेचे एक उत्तम उदाहरण आहात. तुमच्या मदतीबद्दल आणि दयाळूपणाबद्दल मी आभारी आहे.

मीराच्या या पोस्टवर चाहत्यांनी लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव केला आहे. तर काहींनी माजिवडा ठाण्यात येतं, त्यामुळे मदतीला आलेले ठाणे पोलीस असतील, असं म्हटलं आहे. तर, अनेकांनी मीराची मदत करणाऱ्या त्या दुचाकीवरील व्यक्तीचं कौतुक केलं आहे.