नाशिकच्या मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावात साडेतीन वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. या घटनेने जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात तीव्र संतापाची लाट पसरली आहे. आरोपीला भर चौकात फाशी देण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत आहे. शवविच्छेदन अहवालात चिमुकलीवर अत्याचार झाल्याचं तसेच डोक्यात वर्मी घाव बसल्याने तिचा मृत्यू झाल्याचं नमूद केलं गेलं आहे. या घटनेबाबत मराठी अभिनेत्री रुचिरा जाधव हिने व्हिडीओ शेअर करत संताप व्यक्त केला आहे.
रुचिरा म्हणाली, “सोशल मीडियावर जे काही मी पाहतेय. ज्या काही बातम्या, व्हिडीओ येत आहेत…मालेगावमध्ये जे काही घडलंय, त्याबद्दल मी आज बोलतेय. ४ वर्षांची मुलगी ती…या गोष्टीचं जोपर्यंत आपण मूळ शोधत नाही आणि त्या गोष्टीच्या मुळापर्यंत जाऊन आपण काहीच करणार नाही तोपर्यंत हे होत राहणार…आता आपण या घटनेबद्दल वाचणार, प्रतिक्रिया देणार…हळहळ व्यक्त करणार…बापरे म्हणणार! पण, पुढे काहीच नाही होणार उद्यापासून मी माझ्या कामाला लागणार, तुम्ही तुमचं काम करणार. या गोष्टीचं मूळ जोपर्यंत सापडत नाही तोपर्यंत आपण काहीच करू शकत नाही. जर या मुलीला न्याय मिळाल नाही तर एक समाज म्हणून आपण नापास आहोत. पूर्णपणे नापास!”
अभिनेत्री पुढे म्हणाली, “समाजाची मानसिकता ही सगळ्यात मोठी समस्या आहे. मला सांगा या मुलीने वाईट कपडे घातले होते का? आता कपड्यांना दोष देता येणार नाही…आता काय कराल? ४ वर्षांची मुलगी होती ती… आता कोणाला दोष द्याल? प्रत्येकवेळी तेच कारण नसू शकतं. मी हे म्हणणार नाही की जगात जे चालूये ते सगळंच चांगलंच सुरूये…सगळ्याच मुली बरोबर आहेत असंही मी म्हणणार नाही. पण, जेव्हा अशा गोष्टी होतात तेव्हा इतर गोष्टींकडे लक्ष न देता आपण प्रत्येक गोष्टीचं मूळ शोधलं पाहिजे. मी आज व्यक्त झाले नाही तर एक स्त्री म्हणून माझी मला लाज वाटेल.”
“मला माहिती नाही…असं व्यक्त होणं किती योग्य आहे किती अयोग्य. पण नाही…हे फार क्रूर आहे, ही राक्षसी प्रवृत्ती आहे. ज्या महाराजांच्या भूमीत आपण राहतो. आज तिथे हे सगळं होतंय…हे विचित्र आहे. हे जर होत राहिलं तर विनाश फार लांब नाही. अजिबातच लांब नाही. माझी प्रशासनाला, सरकारला विनंती आहे की, प्लीज प्लीज…काहीतरी करा. आता न्याय हवाय!” असं प्रतिक्रिया रुचिराने दिली आहे.
दरम्यान, न्यायालयाने आरोपीला २० नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या घटनेच्या निषेधार्थ सोमवारी डोंगराळे येथे संतप्त गावकऱ्यांनी मालेगाव कुसुंबा रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन केलं. तसेच नराधमाला लवकरात लवकर फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.
