Titeeksha Tawde Went To Kokan : कोकणात गणेशोत्सव आणि शिमगा ( होळी ) हे दोन सण खूप महत्त्वाचे मानले जातात. मुंबईकर कोकणवासी दरवर्षी न चुकता या दोन्ही सणांना आपल्या मूळ गावी जातात. सामान्य लोकांप्रमाणे मराठी कलाविश्वातील अनेक सेलिब्रिटी सुद्धा सणासुदीला कोकणात जातात. निखिल बने, संतोष जुवेकर, छाया कदम, माधवी निमकर हे कलाकार त्यांच्या सोशल मीडियावर नेहमीच गावची झलक शेअर करत असतात. आता मराठी कलाविश्वातील आणखी एक लोकप्रिय अभिनेत्री कोकणात तिच्या गावी पोहोचली आहे.
‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेतून घराघरांत पोहोचलेली लोकप्रिय अभिनेत्री तितीक्षा तावडे गणेशोत्सवासाठी आपल्या कुटुंबीयांसह कोकणात गेली आहे. तितीक्षाने तिच्या माहेरच्या गावच्या घराची झलक सोशल मीडियावर शेअर केली आहे. याशिवाय गणपतीमध्ये कोकणातील घराघरांत भजनाचे कार्यक्रम आयोजित केले जातात. याचीही झलक तितीक्षाच्या नुकत्याच शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे.
बाप्पाचं आगमन झाल्यावर घराघरांत भजनाचे कार्यक्रम आयोजित केले जातात. वर्षभर कोकणातील माणूस या भजनाच्या आवाजाची आतुरतेने वाट पाहत असतो असं कॅप्शन तितीक्षाने या व्हिडीओला दिलं आहे. याशिवाय अभिनेत्रीने गावातील काही फोटो देखील शेअर केले आहेत. यामध्ये कोकणातील कौलारू घर, भातशेती, गावातील निसर्गरम्य वातावरण पाहायला मिळतंय.
तितीक्षाने शेअर केलेल्या व्हिडीओ अन् फोटोवर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. “हे सुख फक्त आपल्या कोकणात आहे”, “भजनाक मेन्यू काय आसा?”, “भजन म्हणजे सुख…खरंच आतुरतेने वाट पाहत असतो”, “आमची असरोंडी खूप सुंदर गाव” अशा प्रतिक्रिया युजर्सनी या व्हिडीओवर दिल्या आहेत.
तितीक्षा गेल्यावर्षी सुद्धा तिचा पती अभिनेता सिद्धार्थ बोडकेसह कोकणात तिच्या माहेरी गेली होती. सिद्धार्थ हा मूळचा नाशिकचा तर, तितीक्षा ही कोकणातील आहे. सणासुदीला अभिनेत्री आपल्या कुटुंबीयांसह नेहमीच कोकणात जाते.
दरम्यान, तितीक्षाच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं, तर अभिनेत्रीने काही दिवसांपूर्वीच सुरुची अडारकर आणि ऐश्वर्या नारकर यांच्या सोबतीने साड्यांचा नवीन ब्रँड सुरू केला आहे. आता अभिनेत्री नव्या कोणत्या प्रोजेक्टमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार याची सगळे आतुरतेने वाट पाहत आहेत.