Yogita Chavan Dance Video : ‘जीव माझा गुंतला’ ही मालिका ‘कलर्स मराठी’ वाहिनीवर २०२१ ते २०२३ या दरम्यान प्रसारित केली जायची. या मालिकेत लोकप्रिय अभिनेत्री योगिता चव्हाणने प्रमुख भूमिका साकारली होती. तिने साकारलेल्या ‘अंतरा’ या पात्राने सगळ्या प्रेक्षकांचं मन जिंकून घेतलं होतं. या मालिकेनंतर योगिताची एन्ट्री ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वात झाली होती. यामध्ये तिचा सरळसाधा स्वभाव सर्वांनाच भावला होता. सध्या अभिनेत्री सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असते.
गेल्या काही दिवसांपासून योगिताचे डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. अभिनेत्रीला डान्सची प्रचंड आवड आहे. योगिताचे सध्याचे डान्स व्हिडीओ पाहून ती प्रोफेशनल डान्सर वाटतेय अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी तिच्या व्हिडीओवर केल्या आहेत.
योगिताने नुकताच “तेनु काला चश्मा जचदा ऐ…जचदा ऐ गोरे मुखड़े ते…” या कतरिना कैफच्या सुपरहिट बॉलीवूड गाण्यावर जबरदस्त डान्स केल्याचं पाहायला मिळालं. हे गाणं कतरिना कैफ आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांच्यावर चित्रीत झालं असून नेहा कक्कर, बादशहा, अमर अर्शी हे या गाण्याचे पार्श्वगायक आहेत. ‘बार बार देखो’ हा सिनेमा २०१६ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर यश मिळवू शकला नाही मात्र, यामधल्या ‘काला चश्मा’ या गाण्याची लोकप्रियता आजही कायम आहे.
योगिताच्या डान्स व्हिडीओवर अक्षया नाईक, कोकण हार्टेड गर्ल अंकिता वालावलकर यांनी खास कमेंट्स केल्या आहेत. याशिवाय अभिनेत्रीचा हटके डान्स पाहून नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर कमेंट्सचा वर्षाव केला आहे. “सुपर डान्स Moves”, “योगिता कमाल डान्स करतेस”, “सुपर से उपर”, “कडक डान्स… तू प्रोफेशनल डान्सर आहेस का?”, “वॉव व्हॉट अ डान्स प्रोफेशनल एकदम…” अशा प्रतिक्रिया अभिनेत्रीच्या व्हिडीओवर आल्या आहेत.
दरम्यान, योगिताच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं, तर यंदा गणेशोत्सवात प्रदर्शित झालेल्या ‘शंकराचा बाळ आला’ या म्युझिक व्हिडीओमध्ये तिने महत्त्वाची भूमिका साकारली होती. हे गाणं वैशाली माडेने गायलं असून यात योगितासह मुख्य भूमिकेत अभिनेता अभिजीत केळकर झळकला होता.