Mee Sansar Majha Rekhite New Marathi Serial Promo : छोट्या पडद्यावर गेल्या काही महिन्यांत अनेक नवनवीन मालिका सुरू झाल्या आहेत. जवळपास सगळ्याच मालिकांमध्ये दिग्गज कलाकार झळकत असल्याचं सध्या पाहायला मिळत आहे. या सगळ्या मालिकांना प्रेक्षकांचा सुद्धा तुफान प्रतिसाद मिळतोय. आता यामध्ये आणखी एका मालिकेचं नाव जोडलं जाणार आहे. लवकरच छोट्या पडद्यावर एक नवीकोरी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. याबद्दल सविस्तर जाणून घेऊयात…

छोट्या पडद्यावर डिसेंबर महिन्यात सुरू होणाऱ्या या मालिकेचं नाव आहे ‘मी संसार माझा रेखिते’. ही मालिका ‘सन मराठी’ वाहिनीवर प्रसारित केली जाणार आहे. या मालिकेची पहिली झलक काही दिवसांपूर्वीच सोशल मीडियावर शेअर करण्यात आली होती. तेव्हापासून मालिकेत मुख्य अभिनेत्रीची भूमिका कोण साकारणार याबद्दल सर्वत्र उत्सुकता निर्माण झाली होती.

अखेर ‘मी संसार माझा रेखिते’ या मालिकेत लोकप्रिय अभिनेत्री दिप्ती केतकर मुख्य नायिका म्हणून झळकणार असल्याचं नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोतून स्पष्ट झालं आहे. प्रोमोमध्ये सुरुवातीलाच दिप्तीचा साधा-सुंदर लूक लक्ष वेधून घेतो. सकाळ झाली की, घरातील सगळी कामं सुरू होतात…यानंतर सगळ्यांचे डबे बनवा, नाश्ता, जेवण या सगळ्या गोष्टीत दिवस असाच निघून जातो. मात्र, इतकं काम करूनही दिप्तीशी मुलगी सोडून घरातील कुणीच आपुलकीने बोलत नाही. नेहमी तिचा रागराग केला जातो…असं मालिकेच्या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे. मात्र, “जोडायचं ठरवलं तर सगळं जोडता येतं” या तत्त्वानुसार नायिका आयुष्य जगत असते.

‘मी संसार माझा रेखिते’ या मालिकेत दिप्ती केतकरसह हरीश दुधाडे, रोहिणी निनावे, प्रणिता आचरेकर, संजीवनी जाधव, आभा बोडस आणि दिप्ती सोनावणे अशी जबरदस्त स्टारकास्ट आहे.

‘मी संसार माझा रेखिते’ ही मालिका ‘सन मराठी’ वाहिनीवर १ डिसेंबरपासून सुरू होणार आहे. ही मालिका रात्री ९:३० वाजता प्रसारित केली जाईल. दरम्यान, प्रेक्षकांनी मालिकेच्या या नव्या प्रोमोवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. तसेच माधवी निमकर, राज मोरे, अश्विनी मुकादम, अंकित मोहन या कलाकारांनी प्रोमोवर प्रतिक्रिया देत दिप्ती, हरीश आणि मालिकेच्या संपूर्ण टीमचं कौतुक केलं आहे.