‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमामुळे अभिनेता डॉ. निलेश साबळेचं नाव घराघरांत लोकप्रिय झालं. गेली अनेक वर्षे तो ‘चला हवा येऊ द्या’मध्ये सूत्रसंचालकाची भूमिका निभावत होता. १० वर्षे प्रेक्षकांचं मनोरंज करून या कार्यक्रमाने प्रेक्षकांचा निरोप घेतला. परंतु, शो संपल्यावर अवघ्या काही महिन्यांतच डॉ. निलेश साबळे पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. कलर्स मराठी वाहिनीवर २७ एप्रिलपासून ‘हसताय ना? हसायलाच पाहिजे’ हा कार्यक्रम सुरू होणार आहे.

‘हसताय ना? हसायलाच पाहिजे’ मध्ये निलेशसह भाऊ कदम, ओंकार भोजने, स्नेहल शिदम असे विनोदवीर झळकणार आहेत. खरंतर ‘हसताय ना? हसायलाच पाहिजे’ हा डायलॉग गेली अनेक वर्षे निलेश प्रेक्षकांशी संवाद साधताना वापरत आहे. आता या नवीन शोला हेच नाव द्यावं असं कधी सुचलं? असा प्रश्न त्याला राजश्री मराठीच्या मुलाखतीत विचारण्यात आला. यावर अभिनेत्याने या नावामागचा किस्सा प्रेक्षकांबरोबर शेअर केला आहे.

हेही वाचा : “शिवराज अष्टकात महाराजांची भूमिका…”, चिन्मय मांडलेकरच्या निर्णयानंतर दिग्पाल लांजेकरांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

अभिनेता म्हणाला, “जेव्हा केदार सरांशी नावांबाबत चर्चा झाली तेव्हा त्यांनी विचारलं, तुझ्या डोक्यात नावं काय आहेत? त्यावेळी मी त्यांना माझ्या डोक्यात असलेली चार-पाच नाव दाखवली. मी आधी या नावांचे तुकडे केले होते. ‘द हसताय ना शो’ आणि ‘द हसायलाच पाहिजे शो’ अशी नावं ठरवून बघूया आता सरांना कोणतं आवडतंय या विचारात मी होतो.”

हेही वाचा : Video : ‘आई कुठे काय करते’ फेम अभिनेत्रीचा नव्या घरात गृहप्रवेश! व्हिडीओमध्ये दिसली कुटुंबाची झलक, म्हणाली…

“केदार सरांनी दोन्ही नावं ऐकल्यावर ते म्हणाले कशाला नावांचे तुकडे करायचे. आपण हे नाव एकत्र करूया. कारण, हे संपूर्ण वाक्य तुझंच आहे. ‘हसताय ना? हसायलाच पाहिजे’ हे नाव आपण ठेऊया. माझं असं झालं त्यांना आवडलं मग चालेल. यामागे अजून एक कारण आहे. ते म्हणजे हे नाव ठेवल्यावर हा शो लोकांपर्यंत पोहोचवणं फार अवघड नाही जाणार. माझ्या या वाक्यामुळे लोकांना लगेच कळेल माझं म्हणणं काय आहे आणि शोबरोबर प्रेक्षक लगेच कनेक्ट होतील.” असं निलेश साबळेने सांगितलं.