प्रसिद्ध लेखक-दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर आणि अभिनेता चिन्मय मांडलेकर या दोघांनी ‘शिवराज अष्टक’ मालिकेतील पाच चित्रपटांसाठी एकत्र काम केलं आहे. चिन्मय मांडलेकरने नुकताच एक व्हिडीओ शेअर करत सोशल मीडियावर मुलाच्या नावाने झालेल्या ट्रोलिंगमुळे इथून पुढे छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका करणार नाही असं स्पष्ट केलं. अभिनेत्याने घेतलेल्या या निर्णयामुळे मनोरंजनसृष्टीतील कलाकारांसह त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला. या सगळ्यावर आता शिवराज अष्टक मालिकेचे दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
श्री शिवराज अष्टक मालिकेतील ‘फर्जंद’, ‘फत्तेशिकस्त’, ‘पावनखिंड’, ‘शेर शिवराज’ आणि गेल्यावर्षी प्रेक्षकांच्या भेटीला आलेला ‘सुभेदार’ या सगळ्या चित्रपटांना प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. या मालिकेतील प्रत्येक चित्रपटाची इतिहासप्रेमी आतुरतेने वाट पाहत असतात. परंतु, चिन्मयने घेतलेल्या या मोठ्या निर्णयामुळे चित्रपटांच्या उर्वरित भागांमध्ये महाराजांची भूमिका कोण साकारणार असा प्रश्न प्रत्येकाच्या मनात निर्माण झाला आहे. यासंदर्भात चिन्मयच्या पोस्टवर अनेक कमेंट्स देखील आल्या आहेत.
हेही वाचा : Video : ‘आई कुठे काय करते’ फेम अभिनेत्रीचा नव्या घरात गृहप्रवेश! व्हिडीओमध्ये दिसली कुटुंबाची झलक, म्हणाली…
दिग्पाल लांजेकर यांनी नुकतीच ‘लोकमत फिल्मी’ला मुलाखत देताना याविषयी मत मांडलं आहे. ते म्हणाले, “चिन्मयशी याविषयावर माझी अद्याप सविस्तर चर्चा झालेली नाही. आमचं जुजबी मेसेजच्या रुपात बोलणं झालं. पण, त्याने हा निर्णय घेण्याआधी आमची चर्चा झालेली नाही. आज चर्चा होईल असं अपेक्षित आहे. शिवराज अष्टक मालिकेत महाराजांची भूमिका अजूनतरी चिन्मयच करणार आहे. पण, आमची चर्चा झाल्यावर अंतिम जे काही आहे ते कळेल.”
हेही वाचा : ‘चला हवा येऊ द्या’ संपल्यावर लोकप्रिय अभिनेत्याची ‘झी मराठी’च्या ‘शिवा’ मालिकेत एन्ट्री, पाहा प्रोमो
“सध्या मी काहीही बोलायला समर्थ नाही कारण, अनेक गोष्टींची मला कल्पना नाही. या सगळ्या गोष्टींवर शिवराज अष्टक अवलंबून आहे. कारण, शिवराज अष्टक मालिका केवळ सिनेमाचा भाग नसून तो लोकांच्या भावनेचा भाग आहे. प्रत्येकाला त्यात सहभागी व्हावं लागेल. चर्चा झाल्याशिवाय सध्या यावर मी काहीही बोलणं चुकीचं ठरेल” असं दिग्पाल लांजेकर यांनी सांगितलं.
हेही वाचा : Video : सातासमुद्रापार ‘नाच गं घुमा’! मुक्ता बर्वेचा परदेशात जबरदस्त डान्स, व्हिडीओवर कमेंट्सचा पाऊस
दरम्यान, सध्या मराठी कलाविश्वातील सई ताम्हणकर, गौतमी देशपांडे, रवी जाधव, मृण्मयी देशपांडे, सुरुद गोडबोले, सिद्धार्थ चांदेकर, अदिती सारंगधर, ऋजुता देशमुख या कलाकारांनी चिन्मयला पाठिंबा देत या निर्णयावर पुनर्विचार करण्याची विनंती केली आहे.