Maharashtrachi Hasyajatra Fame Nimish Kulkarni : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या विनोदी कार्यक्रमातून घराघरांत पोहोचलेल्या निमिश कुलकर्णीने त्याच्या सगळ्या चाहत्यांना नुकतीच आनंदाची बातमी दिली आहे. २५ जुलैला अभिनेत्याचा साखरपुडा पार पडला; याचे सुंदर फोटो निमिशने नुकतेच इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

हास्यजत्रेमुळे अनेक नवोदित कलाकार घराघरांत लोकप्रिय झाले. या शोचे चाहते केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर जगभरात आहेत. निमिशला सुद्धा या कार्यक्रमामुळे एक वेगळी ओळख मिळाली.

निमिश कुलकर्णीवर सध्या संपूर्ण मराठी मनोरंजनविश्वातून शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे. हास्यजत्रेच्या कलाकारांनी निमिशसाठी खास पोस्ट शेअर करत त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील लोकप्रिय अभिनेते समीर चौघुले यांनी निमिशने शेअर केलेल्या साखरपुड्याच्या फोटोंवर “खूप खूप अभिनंदन जावईबापू” अशी कमेंट केली आहे. शोमध्ये एकत्र स्किट सादर करताना निमिश आणि समीर चौघुले जावई आणि सासरेबुवा अशी पात्रं साकारली होती, त्यामुळेच समीर चौघुलेंनी हटके लिहित त्याला शुभेच्छा दिल्या आहेत.

यासह निखिल बने निमिशला शुभेच्छा देताना लिहितो, “अभिनंदन निमू आणि कोमू…बाकी भेटलो की बोलूच आपण” निमिशच्या होणाऱ्या पत्नीचं नाव कोमल भास्कर आहे. अनेक मराठी मालिकांची क्रिएटिव्ह हेड म्हणून तिने जबाबदारी सांभाळली आहे.

गौरव मोरे, वनिता खरात, नम्रता संभेराव, शिवाली परब अशा हास्यजत्रेत झळकलेल्या प्रत्येक कलाकाराने निमिशवर शुभेच्छांचा पाऊस पाडला आहे. शिवाली परबने देखील निमिश आणि कोमल यांना शुभेच्छा देण्यासाठी खास पोस्ट देखील शेअर केली आहे.

“खूप खूप अभिनंदन माय बेबीज…खूप प्रेम असेच कायम एकमेकांबरोबर राहा…तुम्हाला कोणाची नजर ना लागो” अशी पोस्ट शेअर करत शिवालीने निमिशला साखरपुडा होताच शुभेच्छा दिल्या आहेत.

शिवाली परबची खास पोस्ट ( shivali parab )

दरम्यान, निमिश कुलकर्णीच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायंच झालं, तर त्याने आजवर अनेक मालिका व शोमध्ये काम केलं. काही महिन्यांपूर्वी अभिनेता सई ताम्हणकरची महत्त्वपूर्ण भूमिका असलेल्या ‘अग्नी’ या बॉलीवूड सिनेमात झळकला होता.