अभिनेत्री मुग्धा कर्णिक(Mugdha Karnik) ‘पारू’ या मालिकेमुळे घराघरांत पोहोचली आहे. ‘पारू'(Paaru) या मालिकेत अभिनेत्रीने अहिल्यादेवी किर्लोस्कर ही भूमिका साकारली आहे. खंबीर, आत्मविश्वासू, यशस्वी उद्योजिका, मुलांच्या भल्यासाठी सतत धडपड करणारी अशी ही अहिल्यादेवी असल्याचे पाहायला मिळते. तिच्या भूमिकेला प्रेक्षकांकडून खूप प्रेम मिळताना दिसते. आता मात्र अभिनेत्री पारू या मालिकेतील तिच्या भूमिकेमुळे नाही, तर तिने केलेल्या एका वक्तव्यामुळे चर्चेत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुग्धा कर्णिक काय म्हणाली?

मुग्धा कर्णिकने नुकताच ‘सेलिब्रिटी कट्टा’बरोबर संवाद साधला. यावेळी क्षिती जोगबरोबरच्या मैत्रीबाबत अभिनेत्रीने वक्तव्य केले. “आम्ही दोघी गेली २४ वर्षे मैत्रिणी आहोत. कॉलेजमधील ती माझी पहिली मैत्रीण आहे. माझ्या आयुष्यातील ती माझा महत्त्वाचा भाग आहे. चांगले-वाईट दिवस, चढ-उतार सगळं मी तिच्याबरोबर शेअर करते. मी कुठल्या अडचणीत असेन, मला कोणाशी तरी बोलावंसं वाटलं किंवा काहीतरी सल्ला घ्यायचा असेल, तर मी तिला पहिला फोन करते. त्यामुळे ती माझ्या आयुष्यातील काढून न टाकता येणारा भाग आहे. माझं तिच्यावर खूप प्रेम आहे. ती माझी सगळ्यात जवळची व खूप जुनी मैत्रीण आहे”, या शब्दांत मन मोकळे करताना मुग्धा कर्णिकने क्षिती तिची जवळची मैत्रीण असल्याचे म्हटले आहे.

त्याबरोबरच अभिनेत्रीने असेही म्हटले की, ‘फसक्लास दाभाडे’च्या निमित्ताने ती पारू मालिकेत आली होती. आम्ही आतापर्यंत कधी एकत्र काम केलंच नव्हतं. त्यामुळे त्या एका एपिसोडमध्ये एकत्र काम करताना मजा आली.

काही दिवसांपूर्वी क्षिती जोग व हेमंत ढोमे यांनी एका मुलाखतीत त्यांच्या लग्नाबद्दल वक्तव्य केले होते. क्षितीने मुग्धा कर्णिकला तिच्या हेमंतबरोबर लग्न करण्याच्या निर्णयाविषयी सांगितले होते आणि त्यावेळी अभिनेत्रीची प्रतिक्रिया काय होती, याबाबत तिने वक्तव्य केले होते. क्षितीने त्यावर बोलताना म्हटले की, मुग्धा कर्णिक ही मैत्रीण आहे. जी आता झी मराठीच्या पारू मालिकेत अहिल्यादेवीचे पात्र साकारत आहे. ती माझी सगळ्यात जवळची आणि सगळ्यात जुनी मैत्रीण आहे. तिला मी जेव्हा हेमंतबरोबर लग्न करण्याच्या निर्णयाबद्दल सांगितलं, तेव्हा ती मला म्हणाली की, तू तुझ्या निर्णयावर ठाम आहेस का? कारण- तुमच्यात काहीच जुळत नाही, असं एक मत होतं. मी म्हटलं की, मी ठाम नाहीये; पण माझं हे ठरलंय की हे करायचं आहे. पुढे जे होईल, ते आपण बघू, अशी आठवण क्षितीने सांगितली.

दरम्यान, हेमंत ढोमे दिग्दर्शित फसक्लास दाभाडे हा चित्रपट काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. त्यामध्ये क्षिती जोग, सिद्धार्थ चांदेकर, अमेय वाघ हे कलाकार प्रमुख भूमिकांत आहेत.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Paaru fame mugdha karnik on friendship with kshitee jog says she is important part of my life nsp