‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘पारू’ आणि ‘लक्ष्मी निवास’ मालिकेत भव्य मंगलकार्य पाहायला मिळत आहे. एकाबाजूला आदित्य-अनुष्का आणि दुसऱ्या बाजूला जयंत-जान्हवी लग्नबंधनात अडकणार आहेत. त्यामुळे किर्लोस्कर आणि दळवी कुटुंबात लग्नाची धामधूम दिसत आहे. या दोन्ही कुटुंबातला हा भव्य लग्नसोहळा २७ जानेवारीपासून सुरू झाला असून १ फेब्रुवारीपर्यंत पाहायला मिळणार आहे. त्यामुळे सध्या दोन्ही मालिकेतील कलाकार मंडळी खूप चर्चेत आहेत.
‘पारू’ आणि ‘लक्ष्मी निवास’ या मालिकेच्या महासंगमानिमित्ताने कलाकार विविध कलाकार मंडळी विविध एंटरटेनमेंट युट्यूब चॅनेलशी संवाद साधताना दिसत आहेत. नुकताच ‘पारू’ मालिकेतील पारू म्हणजे अभिनेत्री शरयू सोनावणेने ‘कलाकृती मीडिया’शी संवाद साधला. यावेळी तिने नवरा जयंत लाडेचं खूप कौतुक केलं.
शरयू सोनावणे म्हणाली, “मी माझ्या नवऱ्याबद्दल एक गोष्ट सांगू शकते की, तो माझी खूप काळजी घेतो. अगदी लहान मुलाप्रमाणे तो मला सांभाळत असतो. हे मला खूप भारी वाटतं. मला कुठल्याचं चुका करताना भीती नसते. मी चुकलीये, आता काय होईल, असं वाटतं नाही. कारण मला माहीत असतं, माझा नवरा मला सांभाळून घ्यायला आहे. त्यामुळे ही एक गोष्ट मला त्याची खरंच खूप आवडते.”
पुढे शरयू सोनावणे म्हणाली की, माझ्या प्रत्येक गोष्टीमध्ये तो मला मदत करतो आणि तो खूप जास्त सकारात्मक आहे. म्हणजे नकारात्मक गोष्टीला सुद्धा सकारात्मक दृष्टीने कसं बघायचं? त्या गोष्टी आपण कशा सकारात्मकपणे घ्यायच्या? हे त्याच्याकडून शिकण्यासारखं आहे. रोमँटिक असा तो नाही. पण, त्याला बाहेर चार लोकांसमोर कसं राहायचं खूप चांगलं कळतं. जे काही प्रेम आहे, ते आपल्या आपल्यामध्येच, त्याला बाहेर दाखवायला आवडतं नाही किंवा गरज नाही लागतं. आमचं प्रेम काळजीच्या माध्यमातून एकमेकांपर्यंत पोहोचवतो. त्याच्यासाठी रोमँटिक व्हायला पाहिजे, असं आम्हाला वाटतं नाही. आमच्यातला रोमान्स म्हणजे काळजी आहे.
दरम्यान, अभिनेत्री शरयू सोनावणेने २०२३मध्ये जयंत लाडेशी लग्नगाठ बांधली होती. हे लग्न तिने वर्षभर सर्वांपासून लपवून ठेवलं होतं. लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाच्या दिवशी तिने लग्न झाल्याचं जाहीर केलं होतं. तेव्हापासून ती सातत्याने नवऱ्याबरोबर फोटो शेअर करत असते.
© IE Online Media Services (P) Ltd