‘महाभारत’ या लोकप्रिय मालिकेत कर्णाची भूमिका साकारणारे अभिनेते पंकज धीर यांचे ६८ व्या वर्षी निधन झाले आहे. पंकज यांनी एकदा कर्करोगावर मात केली होती, पण त्यांना पुन्हा कर्करोगाचं निदान झालं. त्यानंतर त्यांची प्रकृती खूपच खालावली आणि उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
पंकज धीर यांनी अनेक बॉलीवूड चित्रपटांमध्ये विविधांगी भूमिका साकारून प्रेक्षकांचे मनोरंजन केले होते. पंकज धीर यांच्या पत्नीचे नाव अनिता धीर आहे. पंकज यांना एक मुलगा आहे. तो पंकज यांच्या पावलावर पाऊल ठेवत अभिनय क्षेत्रात आला. इतकंच नाही, तर त्यांची सूनदेखील लोकप्रिय अभिनेत्री आहे. पंकज यांनी स्वतः त्यांच्या मुलासाठी या अभिनेत्रीला सून म्हणून पसंत केलं होतं.
निकितिन धीरचं करिअर
पंकज धीर यांच्या मुलाचे नाव निकितिन धीर आहे. निकितिन धीर लोकप्रिय अभिनेता आहे. निकितिन प्रामुख्याने हिंदी आणि तेलुगू चित्रपटांमध्ये काम करतोय. निकितिनने २००८ मध्ये ‘जोधा अकबर’ या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. नंतर त्याने नागार्जुन – एक योद्धामध्ये अस्तिक ही भूमिका केली होती. तर २०२४ मधील श्रीमद रामायणमध्ये त्याने रावणाचे पात्र साकारले होते. निकितिनने त्याच्या करिअरमध्ये ‘रेडी’ (२०११), ‘चेन्नई एक्स्प्रेस’ (२०१३), ‘कांचे’ (२०१५), ‘शेरशाह’ (२०२१) आणि ‘सूर्यवंशी’ या चित्रपटांमध्ये विविध भूमिका साकरल्या. तसेच त्याने रोहित शेट्टीच्या ‘इंडियन पोलीस फोर्स’ (२०२४) या सीरिजमध्येही काम केलं होतं.
निकितिन धीरची पत्नी आहे अभिनेत्री
निकितिन धीर याचं लग्न लोकप्रिय अभिनेत्री कृतिका सेंगर हिच्याशी झालंय. या जोडप्याला एक मुलगी आहे. कृतिका सेंगरने पुनर्विवाह, कसम, एक वीर स्त्री की कहानी झांसी की रानी, सर्विसवाली बहु, मॅरिड अगेन, कसौटी जिंदगी की, छोटी सरदारनी, किस देश मे है मेरा दिल या मालिकांमध्ये काम केलंय.
निकितिन धीर व कृतिका सेंगरचं अरेंज मॅरेज
२०१४ मध्ये निकितिनचे वडील पंकज धीर एक चित्रपट दिग्दर्शित करणार होते. त्या चित्रपटासाठी ऑडिशन सुरू होते. कृतिका तिथे ऑडिशनसाठी गेली होती. पंकज यांना कृतिकाचं काम फार आवडलं. त्यांनी तिला मुख्य भूमिकेसाठी घेतलं, त्याबरोबर मुलासाठी सून म्हणूनही पसंत केलं. पंकज यांनी निकितिनशी लग्न करण्यासाठी कृतिकाला विचारलं. नंतर त्यांनी कृतिकाच्या आई-वडिलांची भेट घेतली. मग कृतिका व निकितिन भेटले, त्या दोघांनी होकार दिला आणि ३ डिसेंबर २०१४ रोजी त्यांचं लग्न झालं. लग्नानंतर ८ वर्षांनी मे २०२२ मध्ये कृतिका व निकितिन आई-बाबा झाले. त्यांना देविका धीर नावाची मुलगी आहे.