Raja Chaudhary allegations on Shweta Tiwari: श्वेता तिवारी ही टीव्ही इंडस्ट्रीतील सर्वात लोकप्रिय अभिनेत्री आहे. ‘कसौटी जिंदगी के’ मालिकेमुळे घराघरांत पोहोचली. ‘चित्रहार’ आणि ‘बिग बॉस’सारख्या शोचा भाग राहिलेल्या श्वेताचं अभिनय करिअर खूप यशस्वी राहिलं. पण तिचं वैयक्तिक आयुष्य मात्र चढ-उतारांनी भरलेलं राहिलं.
श्वेता तिवारीने मालिका, चित्रपट व ओटीटी या तिन्ही माध्यमांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला. वैयक्तिक आयुष्यात मात्र तिला अनेक अडचणी आल्या. तिने दोनदा लग्न केले पण दोन्ही वेळा घटस्फोट झाले. राजा चौधरीबरोबरच्या पहिल्या लग्नापासून तिला एक मुलगी पलक आहे, तर दुसऱ्या पतीपासून तिला एक मुलगा आहे. दोन्ही मुलं श्वेताबरोबर राहतात. आता श्वेताचा पहिला पती राजा चौधरीने तिच्यावर विवाहबाह्य संबंधांचे आरोप केले आहेत.
राजा चौधरीने त्याची एक्स पत्नी श्वेता तिवारीबद्दलच्या ताज्या मुलाखतीत दावा केला की, लग्नात ती त्याला फसवत होती. विवाहित असूनही श्वेताचे ‘कसौटी जिंदगी की’ मधील सह-अभिनेत्री सिझेन खानबरोबर अफेअर होते. घटस्फोटादरम्यान याबद्दल समजलं होतं, असंही राजाने म्हटलंय.
राजा चौधरीने नुकतीच हिंदी रशला मुलाखत दिली. मुलाखतीत राजा श्वेताबद्दल म्हणाला, “आमचा घटस्फोट २००३ मध्येच व्हायला हवा होता.” श्वेताबरोबर लग्नात असतानाची आठवण सांगत राजा म्हणाला, “आमची एक कार होती, ज्यामध्ये माझी काही कागदपत्रे होती, म्हणून मी श्वेताच्या शूटिंग सेटवर गेलो होतो. तिथे मी पाहिलं की ती सिझेन व त्याच्या ड्रायव्हरबरोबर कारमध्ये येत होती.”
मुलीसाठी खूप सहन केलं- राजा चौधरी
सकाळपासून शूटिंग सुरू असल्याचं सांगण्यात आलं होतं, आपण सेटवर गेलो तेव्हा श्वेता सेटवर नव्हती, असा दावा त्याने केला. राजाने श्वेतावर अफेअरचे आरोप केले. त्यावेळी आपल्यात श्वेताला तिच्या विवाहबाह्य संबंधांबद्दल विचारण्याची हिंमत नव्हती, असंही त्याने म्हटलं. “जेव्हा जेव्हा मी तिला अफेअरबद्दल प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला, तेव्हा ती मला मद्यपी म्हणायची. मुलगी पलकसाठी श्वेताचे खूप टोमणे सहन केले. पलकसाठी गप्प राहिलो होतो,” असं राजा चौधरी म्हणाला.
श्वेता तिवारी व राजा चौधरी यांचे १९९८ मध्ये लग्न झाले होते. पण, त्यांचं नातं फार काळ टिकलं नाही. २००७ मध्ये दोघांनी घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला. २०१२ मध्ये त्यांचा अधिकृत घटस्फोट झाला. घटस्फोटासाठी अर्ज दाखल केल्यानंतर श्वेताने राजावर घरगुती हिंसाचारासह अनेक गंभीर आरोप केले होते. त्याच्यापासून वेगळं झाल्यानंतर अभिनेत्रीने अभिनव कोहलीशी दुसरं लग्न केलं. पण हे नातंही फार टिकलं नाही. दुसऱ्या पतीवरही श्वेताने मारहाणीचे आरोप केले होते.