‘कलर्स मराठी’ वाहिनीवर २०१९ ते २०२२ या दरम्यान ‘राजा राणीची गं जोडी’ ही सुपरहिट मालिका सुरू होती. या मालिकेत अभिनेत्री शिवानी सोनार आणि अभिनेता मणिराज पवार यांनी प्रमुख भूमिका साकारल्या होत्या. त्यावेळी संजू आणि रणजितराव ढालेपाटलांची जोडी घराघरांत लोकप्रिय झाली होती. मात्र, या मालिकेत संजूचा सतत छळ करणारी खलनायिका देखील होती.

संजूविरोधात नेहमीच कट-कारस्थान करणाऱ्या राजश्री अजित ढाले-पाटील म्हणजेच वहिनीसाहेबांची भूमिका अभिनेत्री श्रुती अत्रे साकारत होती. खलनायिकेची भूमिका असली तरीही या मालिकेमुळे तिला घराघरांतून प्रेक्षकांचं प्रचंड प्रेम मिळालं. मालिका संपली असली तरी यामधल्या सगळ्या कलाकारांची लोकप्रियता आजही कायम आहे. सध्या श्रुती तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे.

‘मदर्स डे’निमित्त इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत श्रुतीने लवकरच आई होणार असल्याची गुडन्यूज सर्वांना दिली होती. आता अभिनेत्रीच्या घरी गोंडस अशा बाळाचं आगमन झालेलं आहे. श्रुती अत्रे आई झाली असून तिला पुत्ररत्न प्राप्ती झाली आहे.

श्रुती अत्रे गुडन्यूज शेअर करत लिहिते, “१२/०५/२०२५… आपलं कुटुंब खऱ्या अर्थाने मोठं झालं आणि आधीपेक्षा जरा जास्त हँडसम झालंय…बेबी बॉय” अभिनेत्रीच्या या पोस्टवर मराठी कलाकारांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

दरम्यान, श्रुती अत्रेबद्दल सांगायचं झालं, तर तिच्या पतीचं नाव अश्विन असं आहे. त्यांचा लग्नसोहळा २०१९ मध्ये पार पडला होता. ‘राजा राणीची गं जोडी’ या मालिकेनंतर ती ‘कॉन्स्टेबल मंजू’ मालिकेत पाहायला मिळाली. याशिवाय श्रुतीने ‘बापमाणूस’, ‘बन मस्का’ या मालिकांमध्येही काम केलेलं आहे.

यापूर्वी सोशल मीडियावर प्रेग्नन्सीची घोषणा करताना श्रुती अत्रेने पोस्ट शेअर करत आपल्या मातृत्वाबद्दलच्या भावना व्यक्त केल्या होत्या. ती म्हणाली होती, “यंदाचा मातृदिन माझ्यासाठी वेगळा आहे. आमचं कुटुंब आता मोठं होणार आहे आणि ही गोड बातमी तुम्हा सर्वांबरोबर शेअर करताना आम्हाला खूप आनंद होत आहे. हा प्रवास सोपा नव्हता… या प्रवासात प्रचंड अडचणी आल्या, काही भीतीचे क्षण होते. पण, या सगळ्यात आमच्याबरोबर तुम्हा सर्वांचं प्रेम कायम होतं. प्रत्येक आईला आणि लवकरच आई होणाऱ्या प्रत्येक महिलेला मातृदिनाच्या खूप खूप शुभेच्छा!”