हिंदी टेलीव्हिजन विश्वातील लोकप्रिय मालिका म्हणजे ‘अनुपमा’ आणि या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येणारी सर्वांचीच आवडत्या अभिनेत्री म्हणजे रुपाली गांगुली. अभिनयाबरोबरच रुपाली सोशल मीडियावरही तितक्याच सक्रिय असतात. सोशल मीडियाद्वारे त्या प्रत्येक सामाजिक आणि राजकीय मुद्द्यावर उघडपणे बोलताना दिसतात. नुकत्याच झालेल्या पहलगाम, ऑपरेशन सिंदूर आणि भारत-पाकिस्तान तणावावरही अभिनेत्रीने प्रतिक्रिया व्यक्त केल्या.

अशातच रुपाली यांनी प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेते प्रकाश राज यांच्या एका पोस्टवर संताप व्यक्त केला आहे. खरंतर, प्रकाश राज यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ‘ऑपरेशन सिंदूर’शी संबंधित एक व्यंगचित्र शेअर केले आहे. या व्यंगचित्रातून प्रकाश राज यांनी नरेंद्र मोदींचा फोटो शेअर केला आहे आणि या व्यंगचित्रात रक्तदान शिबिरऐवजी सिंदूर दान शिबिर सुरू असल्याचे दिसत आहे.

हे व्यंगचित्र शेअर करत त्यांनी कॅप्शनमध्ये “काहीही नाही, माझ्या नसांमधून फक्त निवडणुका प्रवाहित होत आहेत” असं म्हटलं आहे. तसंच पुढे त्यांनी ‘जस्ट आस्किंग’ हा हॅशटॅगदेखील लिहिला आहे. प्रकाश राज यांनी शेअर केलेलं हे व्यंगचित्र पाहून रुपाली गांगुली त्यांच्यावर संतापल्या आहेत आणि याबद्दल त्यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

रुपाली यांनी आपल्या एक्सवर हे व्यंगचित्र शेअर करत म्हटलं आहे, “प्रकाशजी. हे किती खालच्या दर्जाचे आहे. २०१९ च्या निवडणुकीत मिळालेल्या मतदानाच्या टक्केवारीपेक्षाही कमी.” रुपाली यांची ही पोस्ट आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. राष्ट्रीय मुद्द्यांवर रुपाली गांगुली यांनी त्यांचं ठाम मत व्यक्त करण्याची ही काही पहिलीच वेळ नाही.

पाकिस्तानबरोबरच्या तणावामुळे त्यांनी यापूर्वी आपल्या चाहत्यांना तुर्कीवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन केले आहे. गेल्या आठवड्यात त्यांनी देशाची संवेदनशील माहिती पाकिस्तानला देण्याबद्दल पकडण्यात आलेल्या युट्यूबर ज्योती मल्होत्राचा निषेध केला होता. तसंच ऑपरेशन सिंदूरला ‘लज्जास्पद हल्ला’ म्हणणाऱ्या पाकिस्तानी अभिनेता फवाद खानवरही त्यांनी टीका केली होती.

दरम्यान, प्रकाश राज हे त्यांच्या रोखठोक स्वभावासाठी ओळखले जातात. अनेकदा त्यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. लल्लनटॉपला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी याबद्दल “भूमिका व्यक्त करताना प्रश्न विचारणं आणि सत्य बोलणं ही लोकशाहीची खरी ताकद आहे. एक कलाकार म्हणून समाजाला आरसा दाखवणं आणि लोकांना विचार करण्यास प्रेरित करणं ही माझी जबाबदारी आहे” असं म्हटलं होतं.