मराठी मनोरंजन विश्वात ‘अशी ही बनवा बनवी’ या सिनेमाचं नाव सुवर्ण अक्षरात कोरलं गेलं आहे. या चित्रपटातील सगळेच डायलॉग चाहत्यांना तोंडपाठ आहेत. हा सिनेमा प्रदर्शित होऊन आता जवळपास ३७ वर्षे उलटून गेली आहेत. तरीही, ‘धनंजय माने इथेच राहतात का’, ‘आणि हा माझा बायको पार्वती’, ‘तुमचे ७० रुपये वारले’ असे सगळे संवाद सोशल मीडियावर वारंवार चर्चेत येतात, यावरुन असंख्य मीम्स देखील तयार केले जातात.
अलीकडेच ‘अशी ही बनवा बनवी’ सिनेमातील ‘तुमचे ७० रुपये वारले’ या लोकप्रिय डायलॉगवर प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीच्या लेकीने एक नवीन प्रयोग करुन पाहिला आहे. या अभिनेत्रीचं नाव आहे समिधा गुरु. आजवर अनेक लोकप्रिय मालिकांमध्ये समिधाने आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे.
समिधा गुरुने तिची लेक दुर्वा विविध Accents मध्ये ‘तुमचे ७० रुपये वारले’ हा डायलॉग म्हणून दाखवत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. दुर्वाचं हे अनोखं कौशल्य, तिची बोलण्याची शैली पाहून सर्वांनीच तिचं कौतुक केलं आहे.
समिधा गुरु लेकीला म्हणते, “दुर्वा तुला ‘अशी ही बनवा बनवी’मधला तो ‘तुमचे ७० रुपये वारले’ तो डायलॉग माहितीये ना?” यावर दुर्वा “हो माहितीये” असं सांगते. पुढे, समिधा लेकीला हा आयकॉनिक डायलॉग ब्रिटीश, अमेरिकन, Laid back accent, ऑस्ट्रेलियन, इटालियन आणि शेवटी विदर्भातील Accent मध्ये म्हणून दाखवायला सांगते.
समिधा गुरुने या व्हिडीओला, “तुमचे 70 रुपये वारले… दुर्वाचा Accent game, खरंतर ३७ वर्षांपूर्वी ७० रुपये वारले पण आज तिसऱ्या पिढीपर्यंतसुद्धा ते जिवंतच आहेत. ‘अशी ही बनवाबनवी’ आणि त्यामधले डायलॉग हे पिढी दर पिढी असेच जिवंत राहणार आहेत त्यासाठी तुम्हा सगळ्यांचे आभार…” या पोस्टमध्ये समिधाने अशोक सराफ, सचिन पिळगांवकर, निवेदिता सराफ, सुप्रिया पिळगांवकर यांना टॅग केलं आहे. तसेच चूकभूल माफ असंही म्हटलं आहे.
नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर कौतुकाच वर्षाव केला आहे. “किती हुशार आहे ही”, “किती गोड मस्त”, “कमाल करतेय”, “किती-किती गोड आहे तुमची मुलगी”, “लय भारी”, “ग्रेटच आहे तुमची लेक”, “दुर्वा मल्टिटॅलेंटेड आहे”, “ग्रेट व्हिडीओ अशा कंटेटची गरज आहे” अशा प्रतिक्रिया या व्हिडीओवर आल्या आहेत. तसेच मराठी सेलिब्रिटींनी सुद्धा दुर्वाचं कौतुक केलं आहे.