Samruddhi Kelkar Video : आपली एखादी भूमिका जास्तीत जास्त चांगली व्हावी आणि प्रेक्षकांना ती आवडावी यासाठी कलाकार स्वत:वर मेहनत घेताना दिसून येतात. मराठी इंडस्ट्रीत असे अनेक कलाकार आहेत, जे त्यांच्या कामासाठी आणि विविध भूमिकांसाठी ओळखले जातात. प्रेक्षकांपर्यंत आपलं काम विविध प्रकारे पोहोचावं म्हणून हे कलाकार भूमिकेसाठी विशेष तयारी करतात. अशीच वेगळा प्रयत्न करणारी अभिनेत्री म्हणजे समृद्धी केळकर.

‘फुलाला सुगंध मातीचा’ या मालिकेतून घराघरांत पोहोचलेल्या समृद्धी केळकरला प्रेक्षकांचं भरभरुन प्रेम मिळालं. या मालिकेत तिने साकारलेली करारी आणि आत्मविश्वासू कीर्तीची भूमिका प्रेक्षकांना विशेष भावली. या मालिकेनंतर आता समृद्धी नुकतीच एका नव्या मालिकेमधून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. ही मालिका म्हणजे ‘हळद रुसली कुंकू हसलं’. ७ जुलैपासून स्टार प्रवाह वाहिनीवर ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.

या मालिकेत समृद्धी मातीशी नाळ असलेली आणि शेतकरीण असल्याचा अभिमान असलेली कृष्णा अशी भूमिका साकारत आहे. या मालिकेतील भूमिकेसाठी अभिनेत्री पूर्णपणे मेहनत घेत आहे. अशातच तिने एक नुकताच एक स्टंट केला आहे आणि याचा व्हिडीओसुद्धा तिने आपल्या सोशल मीडियावर शेअर केला आहे.

समृद्धीने मालिकेतील कृष्णा या भूमिकेसाठी चक्क ३० ते ४० फुट खोल विहरीत उडी मारली. हा क्षण समृद्धीने सोशल मीडियाद्वारे शेअर केला आहे. या व्हिडीओसह ती कृष्णाच्या खास शैलीत असं म्हणते, “इहिरीत उडी मारायची आहे कळल्यानंतर पोटात मोठ्ठा गोळा आला. पन कृष्णेच्या कोल्हापूरी छातीतलं बळ जागं झालं अन् आई अंबाबाईचं नाव घेऊन अस्सल शेतातल्या ३०-४० फूट खोल इहिरीत उडी मारली.”

यानंतर ती असं म्हणते, “भीतीने म्या पाय मागं न्हाय घेतला. पार इषय हार्ड करून टाकला. पहिल्याच टेक मध्ये सीन केला.” यानंतर समृद्धीने या सीनसाठी तिला मदत करणाऱ्या टीमचं कौतुक केलं आहे. तसंच त्यांना धन्यवादही म्हटलं आहे. दरम्यान, समृद्धीने शेअर केलेल्या या व्हिडीओखाली अनेकांनी तिच्या या कृतीचं कौतुक केलं आहे.

अक्षय केळकर, अभिषेक रहाळकर, भूमिजा पाटील, प्राप्ती रेडकर, रेवती लेले, तेजस बर्वे, मधुरा जोशी यांसहल अनेक कलाकारांनी समृद्धीचं कौतुक केलं आहे. त्याचबरोबर अनेक चाहत्यांनीसुद्धा कमेंट्समध्ये “धाकड गर्ल”, “लेडी अक्षय कुमार, “कमाल”, “केवळ अभिमान”, “मानलं तुला”, “एकदम भारीच” अशा अनेक प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.