अभिनेत्री शर्मिष्ठा राऊतनं मराठी सिनेसृष्टीत अभिनयाचा ठसा उमटवल्यानंतर आता निर्मिती क्षेत्रातही पाऊल टाकलं आहे. करिअरची सुरुवात करताना या अभिनेत्रीला खूप स्ट्रगल करावं लागलं. लहानसहान भूमिका करीत शर्मिष्ठानं अभिनय क्षेत्रात पाऊल टाकलं. सुरुवातीला असंही झालं की, कित्येक महिने तिच्याकडे बिलकूल काम नव्हतं. तेव्हा तिनं अभिनय क्षेत्र सोडून नोकरी करण्याचा निर्णय घेतला होता.

डिसेंबरपर्यंत मनासारखं काम मिळालं नाही, तर नोकरी करीत ती करिअरच्या दुसऱ्या मार्गाला वळणार होती. परंतु, एका फोन कॉलनं तिचं नशीब पालटलं. शर्मिष्ठानं नुकतीच ‘राजश्री मराठी’ला मुलाखत दिली. या मुलाखतीदरम्यान शर्मिष्ठानं तिच्या स्ट्रगलबद्दल सांगितलं आहे.

शर्मिष्ठा म्हणाली, “मला ब्रेक मिळत नव्हता. मी आता प्रचंड खूप ऑडिशन्स दिल्या आहेत. मला कंटाळाही यायचा; पण तरीही मी ऑडिशन देऊन यायचे. मग मी माझ्याच मनाशी ठरवलं की, २००८ सुरू होते आणि २००९ डिसेंबरपर्यंत जर आपल्याला संधी मिळाली नाही, तर गपगुमान नोकरी करायची. मग डिसेंबर उजाडला आणि म्हटलं, आता एक महिना उरलाय. आता काही नाही होणार.”

हेही वाचा… “माझ्या डोळ्यातून घळाघळा पाणी…”, घटस्फोट घेतल्यानंतर शर्मिष्ठा राऊतची झाली होती ‘अशी’ अवस्था, अभिनेत्री म्हणाली…

शर्मिष्ठा पुढे म्हणाली, “२९ नोव्हेंबरला मला अभिजीत केळकरने फोन केला होता. आमची ओळख ‘चार दिवस सासूचे’ मालिकेत काम करताना झाली होती. आम्ही एक वर्षभर एकत्र होतो. त्याचा मला फोन आला आणि तो मला म्हणाला, “मी स्टार प्रवाह या वाहिनीवर ‘मन उधाण वाऱ्याचे’ मालिकेत काम करतोय. तर यांना प्रमुख भूमिकेत असणारी अभिनेत्री बदलायची आहे. तेव्हा मी म्हटलं की, अरे यार, कायम बदलीची भूमिकाच येते आणि प्रमुख भूमिका बदलायची असते तेव्हाच मी का आठवतेय.”

तेव्हा अभिजीत मला म्हणाला, “नाही, ऐक ना तू कर ही मालिका. २८ की ३० च एपिसोड झालेत या मालिकेचे. तू एकदा ये आणि ऑडिशन दे.”

मी त्याला म्हटलं, “अरे, याच मालिकेसाठी मी लहान लहान भूमिकेसाठी चार वेळा रिजेक्ट झालेय. तू प्रमुख भूमिकेचं काय घेऊन बसलायस. मग तो मला म्हणाला की, तू एकदा ये आणि प्रयत्न कर”

“मी घाईत ब्रूक स्टुडिओला पोहोचले. मला आठवतं की, ऑडिशनच्या रांगेत माझा १६९ नंबर होता. मी ऑडिशन दिली. ऑडिशन दिल्यानंतर मी हेअर ड्रेसर वगैरे होते तिथे गेले. तिथे त्या विद्याताई मला म्हणाल्या, की दुसरा चेंज सांगितलाय आणि असं कोणाला सांगत नाही आहेत दुसरा चेंज आहे, तर तुम्ही तोपण करून बघा. कदाचित तुमचं काम होईल आणि दुसरा मी चेंज केला. तेव्हा महेशजी मला भेटले. कारण- ती महेश कोठारेंची मालिका होती. त्यांचीही ती निर्माता म्हणून पहिली मालिका होती. आणि ते मला म्हणाले की, डार्लिंग काम करेंगे. मी सांगतो चॅनेलला, मी बोलतो काही काळजी करू नकोस. मी म्हटलं, अरे हे काय झालंय.” शर्मिष्ठा असं म्हणाली.

हेही वाचा… “…अन् मला कॉम्प्रोमाईजसाठी विचारलं”, शर्मिष्ठा राऊतने सांगितला ‘तो’ वाईट अनुभव, म्हणाली…

“नंतर लगेच ४ डिसेंबरला मला कॉल आला की, तू ये आपण करतोय. मला असं झालं होतं की, अरे, ज्या मालिकेत मला लहान भूमिकांसाठी चार वेळा नाकारलं होतं. त्यात मला प्रमुख भूमिका कशी काय मिळाली. या संधीसाठी मी नेहमीच अभिजीतचे आभार मानेन.” असं शर्मिष्ठानं नमूद केलं.