१८ जुलै २०२३पासून प्रेक्षकांच्या भेटीस आलेल्या ‘कुन्या राजाची गं तू रानी’ या मालिकेने अखेर प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. काल, १६ मार्चला या मालिकेचा शेवटचा माग प्रसारित झाला. ‘कुन्या राजाची गं तू रानी’ या मालिकेने अल्पावधीतचं प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं होतं. या मालिकेत अभिनेत्री शर्वरी जोगने साकारलेली गुंजा व अभिनेता हर्षद अतकरीने साकारलेला कबीर या जोडीने प्रेक्षकांची मनं जिंकली होती. त्यामुळे मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर होती. एवढंच नाहीतर टीआरपीच्या यादीतही पहिल्या १०मध्ये ही मालिका असायची. पण काल या मालिकेचा शेवट झाला. ‘कुन्या राजाची गं तू रानी’ मालिकेच्या शेवटच्या भागात नेमकं काय घडलं? जाणून घ्या…

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘कुन्या राजाची गं तू रानी’ मालिकेच्या शेवटच्या भागात कबीर व गुंजाचं लग्न पाहायला मिळालं. एकाबाजूला कबीर-गुंजाचं लग्न सुरू असतं तर दुसऱ्या बाजूला मृण्मयीची आई मायाने एक डाव रचला असतो. तिने लग्नात कबीर-गुंजावर हल्ला करण्यासाठी काहींना गुंडांना पैसे दिले असतात. कबीर-गुंजाचं लग्न होतं असल्यामुळे दोघांचं कुटुंब खूप आनंदात असतं. लग्नाचे विधी सुरू होतात. तेव्हा कबीर मुंडावळ्या खाली येत असल्यामुळे तो नीट करायला जातो आणि तितक्यात त्याला गुंड दिसतात. लग्नात हल्ला होणार याची कल्पना येताच तो सुबोधला सावध करतो. पोलिसांना फोन करायला सांगतो. त्यानंतर गुंजा कबीर वरमाळा घालते तितक्यात गुंड हल्ला करतात. पण कबीर गुंडांच्या हल्ल्यापासून गुंजाला वाचवतो.

हेही वाचा – खुशखबर! सिद्धू मुसेवालाच्या ५८ वर्षांच्या आईने दिला गोंडस मुलाला जन्म, वडील फोटो शेअर करत म्हणाले…

थोड्यावेळात पोलीस देखील तिथे पोहोचतात. तेव्हा कबीर गुंडांना विचारतो की, तुम्हाला इथे कोणी पाठवलं? यावेळी माया मृण्मयीला घेऊन लग्न मंडपातून पळ काढत असते. पण मृण्मयी आईचा हात सोडून कबीरजवळ जाते आणि या गुंडांना आईने पाठवल्याचं सांगते. तसंच गुंड देखील मायाचं नाव घेतात. त्यामुळे मायाला व गुंडांना पोलीस अटक करतात. गुंडांच्या रुपात आलेल्या या संकटानंतर कबीर-गुंजाचं लग्न सुरळीत पार पडतं.

हेही वाचा – “वंदे मातरम दुर्दैवाने राष्ट्रीय गीत झालं”, शरद पोंक्षेंचं वक्तव्य, काँग्रेसचा उल्लेख करत म्हणाले, “हिंदू-मुस्लिम…”

लग्न झाल्यानंतर सगळ्यांच्या आग्रहास्तव दोघं उखाणा घेतात. कबीर उखाणा घेत म्हणतो, “नवी उमेद नवे पाऊल, जॉईन केलं दैनिक स्वराज्य, नव्या आयुष्याची नवी सुरुवात, मनावर मात्र गुंजाचेच राज्य.” त्यानंतर गुंजा उखाणा घेत म्हणते, “रामाची सीता, पांडवांची द्रौपदी, कृष्णाने पळवली रुक्मिणी, सर्वांसमोर सप्तपदी घेऊन झाले मी कबीर साहेबांची रानी.” शेवटी कबीर मजेत गुंजाला विचारतो की, झिपरे कुन्या राजाची गं तू रानी? तेव्हा गुंजा म्हणते, “मी माझ्या कबीर साहेबांची रानी” असं मालिकेच्या शेवटच्या भागात दाखवण्यात आलं.

दरम्यान, ‘कुन्या राजाची गं तू रानी’ मालिकेच्या जागी उद्या, १८ मार्चपासून ‘साधी माणसं’ ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या मालिकेत नवी जोडी पाहायला मिळणार आहे ती म्हणजे शिवानी बावकर व आकाश नलावडे यांची. या मालिकेत शिवानी मीरा, तर आकाश सत्याच्या भूमिकेत झळकणार आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sharvari jog and harshad atkari kunya rajachi ga tu rani marathi serial last episode pps