Shivali Parab Dance Video : ‘कल्याणची चुलबुली’ अभिनेत्री शिवाली परब कधी तिच्या हटके डान्स व्हिडीओमुळे, तर कधी सुंदर फोटोशूटमुळे चर्चेत असते. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या शोमुळे शिवालीला घराघरांत एक वेगळी ओळख मिळाली. अल्पावधीतच तिने प्रेक्षकांचं मन जिंकून घेतलं. शिवाली सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. तिने नुकत्याच शेअर केलेल्या डान्स व्हिडीओने सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
शिवाली परबने बॉलीवूडचा सुपरस्टार अभिनेता गोविंदाच्या गाण्यावर जबरदस्त डान्स केला आहे. या व्हिडीओमध्ये तिच्यासह प्रसिद्ध कोरिओग्राफर रुपेश बने थिरकल्याचं पाहायला मिळत आहे. गोविंदाच्या ‘चल झूठी’ या गाजलेल्या गाण्यावर शिवाली आणि कोरिओग्रापर रुपेश यांनी सुंदर डान्स केला आहे. यावेळी अभिनेत्रीने काळ्या रंगाचा सुंदर कॉलर नेक वनपीस घातला होता.
गोविंदाला ९० च्या दशकातील बॉलीवूडचा सुपरस्टार अभिनेता म्हणून ओळखलं जातं. त्याच्या असंख्य गाजलेल्या चित्रपटांमधील गाणी चाहत्यांमध्ये आजही लोकप्रिय आहेत. शिवाली परबने नुकताच गोविंदाच्या ‘जिस देश में गंगा रहता है’ चित्रपटातील ‘चल झूठी’ गाण्यावर डान्स केला. हा सिनेमा २००० साली प्रदर्शित झाला होता. आज २५ वर्षांनंतरही या सिनेमातील गाण्यांची जादू रसिक प्रेक्षकांच्या मनावर कायम आहे. ‘चल झूठी’ हे मूळ गाणं गोविंदा आणि रिंकी खन्ना यांच्यावर चित्रित झालेलं आहे. या सिनेमात लोकप्रिय अभिनेत्री सोनाली बेंद्रे सुद्धा झळकली होती. आता याच ‘चल झूठी’ गाण्यावर शिवालीने केलेला जबरदस्त डान्स सर्वत्र व्हायरल होत आहे.
व्हिडीओमध्ये शिवाली परबच्या कमाल एक्स्प्रेशन्स सर्वांचं लक्ष वेधून घेत आहेत. नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. “आमची मालवणी राणी मुखर्जी”, “शिवाली तू खतरनाक आहेस सगळं भारी करतेस”, “शिवाली तू भारीच केलंस पण रुपेशचे एक्स्प्रेशन्स सुद्धा कमाल आहेत”, “मस्त- जबरदस्त… शब्दच नाहीयेत शिवाली” अशा प्रतिक्रिया युजर्सनी या व्हिडीओवर दिल्या आहेत.
दरम्यान, शिवाली परबने या डान्स व्हिडीओमध्ये गोविंदा आणि बॉलीवूडचे प्रसिद्ध कोरिओग्राफर गणेश आचार्य यांना टॅग केलं आहे. “तुम्ही सुद्धा बॉलीवूड गाण्याचे चाहते असाल तर आमच्या व्हिडीओवर लाइक करायला विसरू नका” असं कॅप्शन अभिनेत्रीने या डान्स व्हिडीओला दिलं आहे. सध्या शिवालीचा हा डान्स व्हिडीओ सर्वत्र व्हायरल होत आहे.