Spruha Joshi : आपल्या सहजसुंदर अभिनयाने आणि स्वरचित कवितांनी रसिक प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी लोकप्रिय अभिनेत्री म्हणून स्पृहा जोशीला ओळखलं जातं. आजवर अनेक नाटक, सिनेमा व मालिकांमध्ये तिने काम केलेलं आहे. प्रेक्षकांच्या या लाडक्या अभिनेत्रीने नुकतीच चाहत्यांबरोबर एक आनंदाची बातमी शेअर केली आहे. स्पृहा जोशी मावशी झाली आहे.
स्पृहाची धाकटी बहीण क्षिप्रा जोशीचं गेल्यावर्षी डिसेंबर महिन्यात थाटामाटात डोहाळेजेवण पार पडलं होतं. यावेळी स्पृहा लवकरच मावशी होणार असल्याची आनंदाची बातमी सर्वांना समजली होती. काही महिन्यांआधी क्षिप्राने गोंडस मुलाला जन्म दिला. आज बहिणीच्या वाढदिवशी स्पृहाने सर्वांना लाडक्या भाच्याचं नाव सांगितलं आहे. तसेच सोशल मीडियावर बहिणीसाठी पोस्ट देखील शेअर केली आहे.
स्पृहा लिहिते, “वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा माझी डार्लिंग बेबी गर्ल. यावर्षी तुझा वाढदिवस जरा एकस्ट्रा- एक्स्ट्रा स्पेशल आहे आणि हे कबीर नावाचं रिटर्न गिफ्ट तू आम्हाला यंदा आधीच देऊन टाकलं आहेस. त्यासाठी खूप खूप थँक्यू. आय लव्ह यू द मोस्ट…. पण, आता त्यात जरा मोठा वाटेकरी आलाय. खूप प्रेम”
स्पृहाने तिच्या लाडक्या भाच्याचं नाव कबीर असं ठेवल्याचं या पोस्टद्वारे चाहत्यांना सांगितलं आहे. गौतमी देशपांडेने या पोस्टवर कमेंट करत, “आई गं किती गोड” असं म्हटलं आहे. याशिवाय क्षिप्रावर देखील चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
क्षिप्रा जोशीबद्दल सांगायचं झालं, तर २०१० मध्ये दिल्लीत झालेल्या कॉमनवेल्थ गेम ( राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा )मध्ये इंडियन रिदमिक जिम्नॅस्टिक्सची कॅप्टन क्षिप्रा होती. जवळपास १५ ते २० आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये तिने भारताचं नेतृत्व केलं आहे. तिच्या नावावर गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड आहे. तसंच क्षिप्राला शिव छत्रपती पुरस्कार मिळाला असून रिदमिक जिम्नॅस्टिक्समध्ये तिचं नाव प्रचलित आहे.
दरम्यान, स्पृहाने शेअर केलेल्या फोटोंमध्ये तिच्या संपूर्ण कुटुंबीयांची झलक पाहायला मिळत आहे. अभिनेत्रीच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं, तर सध्या ती ‘पुरुष’ या नाटकात महत्त्वपूर्ण भूमिका साकारत आहे.