Aata Hou De Dhingana 4 : टीआरपीच्या शर्यतीत अग्रेसर राहण्यासाठी सध्या छोट्या पडद्यावरील वाहिन्यांमध्ये जोरदार चढाओढ सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वीच ‘झी मराठी’ वाहिनीने ‘चला हवा येऊ द्या’च्या नव्या पर्वाची घोषणा केली. हा शो २६ जुलैपासून शनिवारी आणि रविवार रात्री नऊ वाजता प्रसारित केला जाणार आहे. आता या लोकप्रिय कार्यक्रमाला टक्कर देण्यासाठी ‘स्टार प्रवाह’वर ‘आपला सिद्धू’ नव्या जोमात पुनरागमन करणार आहे.
‘आता होऊ दे धिंगाणा’चा नवीन सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘आता होऊ दे धिंगाणा’च्या या आधीच्या तिन्ही पर्वांना प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम दिलं. रोजच्या धकाधकीच्या जीवनात निखळ मनोरंजनाचे क्षण घेऊन येणारा हा कार्यक्रम फक्त महाराष्ट्रातच नाही तर सातासमुद्रापलीकडेही आवडीने पाहिला जातो. प्रेक्षकांचा हा लाडका कार्यक्रम चौपट मजा आणि चौपट धमाल घेऊन पुन्हा धिंगाणा घालण्यासाठी सज्ज झाला आहे.
९ ऑगस्टपासून शनिवार आणि रविवार रात्री ९ वाजता ‘आता होऊ दे धिंगाणा’चं चौथं पर्व सुरु होत आहे. प्रत्येत पर्वात प्रेक्षकांना काहीतरी नवं देण्याचा ‘स्टार प्रवाह’ वाहिनीचा प्रयत्न असतो. चौथ्या पर्वात प्रेक्षकांना थीमपार्कची जादू अनुभवता येणार आहे.
थीमपार्कमध्ये ज्याप्रमाणे अद्भूत आणि अविश्वसनीय गोष्टींची सफर घडते अगदी त्याप्रमाणेच धिंगाणाचा मंच भन्नाट गेम्सच्या माध्यमातून मनोरंजनाची धमाल सफर घडवणार आहे. मागच्या पर्वात सुपरहिट ठरलेल्या ‘स्मायली काय गायली’, ‘धुऊन टाक’, ‘गोरी गोरी पान गाते किती छान’ या सुपरहिट फेऱ्या नव्या ट्विस्टसह या पर्वातही असणार आहेत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे गेल्या तीन पर्वात ज्या फेरीची सर्वाधिक चर्चा रंगली त्या साडे माडे शिंतोडेचं भव्यदिव्य रुप या पर्वाचं प्रमुख आकर्षण ठरेल.
सुपरस्टार आणि सर्वांचा लाडका होस्ट सिद्धार्थ जाधव या कार्यक्रमाच्या माध्यमातून पुन्हा एकदा धिंगाणा घालण्यासाठी सज्ज होत आहे. सिद्धार्थ जाधवचा सळसळता उत्साह आणि प्रवाह परिवाराचा धिंगाणा एकत्र अनुभवायचा असेल तर आता होऊ दे धिंगाणाचं चौथं पर्व पाहायलाच हवं, असं या प्रोमोतून सांगण्यात येत आहे. दरम्यान, ‘आता होऊ दे धिंगाणा’चं चौथं पर्व ९ ऑगस्टपासून दर शनिवार आणि रविवार रात्री ९ वाजता फक्त ‘स्टार प्रवाह’वर पाहायला मिळणार आहे.